मुहूर्त सापडला ! 400 गुरुजींना ‘प्रमोशन’चे गिफ्ट !

मुहूर्त सापडला ! 400 गुरुजींना ‘प्रमोशन’चे गिफ्ट !
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या केंद्र प्रमुख आणि पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी समुपदेशनाने ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 400 पेक्षा अधिक शिक्षकांना आता केंद्र प्रमुख आणि पदवीधर शिक्षकाची पदोन्नतीचे गिफ्ट मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यापूर्वी मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविली होती.

संबंधित बातम्या :

मात्र केंद्रप्रमुख आणि पदवीधर शिक्षक पदोन्नतीबाबत मार्गदर्शन नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. शासनाने प्रारंभी केंद्रप्रमुख पदे ही सरळसेवेने भरण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे पदोन्नतीस पात्र पदवीधर शिक्षकांमधून याविषयी प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने 50 टक्के पदे हे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला मात्र त्यात टीईटीची अट घातली. नंतर 2013 पुर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना टीईटीची अट शिथील केली.

त्यानंतर आता कुठे हा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी पाटील हे समुपदेशनाने आणि तालुका पातळीवर ऑनलाईन कॉन्फरन्सींगव्दारे ही प्रक्रिया राबविणार आहेत.

सायन्सवाले 77 गुरुजींचे होणार रिव्हर्शन!
गणित- विज्ञान शिकविण्यासाठी बीएस्सी लोकं उपलब्ध नव्हते. त्यामुळे 12 वी सायन्स उत्तीर्ण सुमारे 77 उपाध्यापकांना तात्पुरते पदवीधर पदावर घेतले होते. मात्र शासन आदेशान्वये आता त्यांना परत उपाध्यापक पदावर काम करावे लागणार आहे. दरम्यान, ही पदोन्नती प्रक्रिया न्यायालयापर्यंत पोहचणार असल्याचीही कुणकुण आहे. त्यामुळे या पदोन्नती प्रक्रियेवर लक्ष असणार आहे.

पदवीधर गुरुजी होणार 'साहेब'!
20 नोव्हेंबर रोजी केद्रप्रमुख पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. केंद्र प्रमुख पदासाठी 500 पेक्षा अधिक पदवीधर शिक्षण पात्र आहेत. यातून 89 जागांवर 89 शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे. त्यासाठी बीएड आणि पदवीची अर्हता असावी. पदवीधर शिक्षक पदावर सहा वर्षे सेवा केलेले असावेत. अर्थात त्यांनी सहावी ते आठवी वर्गावर शिकविलेले असावे. असे शिक्षक केंद्र प्रमुख पदासाठी पात्र असणार आहेत.

317 गुरुजींना पदधीवरची लॉटरी!

पदवीधरची 317 पदे आहेत.21 नोव्हेंबर रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. पदोन्नतीसाठी पदवीची अहर्ता असावी. पदवीमध्ये खुल्या प्रवर्गात 50 टकक्के आणि मागासगर्वीयांना 45 टक्के गुण असावेत. तसेच ज्या विषयावर पदवीधरची पदोन्नती घ्यायची आहे, ती पदवी स्वतःकडे असणे गरजेचे आहे. यात बीएसस्सी (विज्ञान-गणित), भाषा विषय, समाजशास्त्र इत्यादी विषयाचा समावेश आहे.

सीईओ व शिक्षणाधिकारी यांनी केंद्रप्रमुख, पदवीधर पदोन्नती देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ही प्रक्रिया राबविताना अगोदर केंद्र प्रमुख पदोन्नती, त्यानंत्तर रिव्हर्शन आणि पुढे पदधीवर पदोन्नती प्रक्रिया करावी.
                                                            – बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते

केंद्रप्रमुख, पदवीधर पदोन्नतीसाठी पाठपुरावा केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सत्यजित तांबे यांनीही मंत्रालयात बैठका लावल्या. त्याचे फलित म्हणूनच आज पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
                                                     – रावसाहेब रोहोकले, शिक्षक नेते,

केंद्रप्रमुख पदे कमी आहेत. त्यामुळे शिक्षक व प्रशासन यांच्यात समन्वय होणे अवघड झाले होते. शिवाय उच्च शिक्षित शिक्षकांना पदोन्नती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासन जे प्रक्रिया राबवित आहे, ती अतिशय योग्य आहे.
                                            – डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते

सीईओंच्या मार्गदर्शनात 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशनाने केंद्र प्रमुख आणि पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाईल. शासनाच्या निर्देशनानुसारच ही पदोन्नती होणार आहे.
                                       – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news