पुणे

Crime News : माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून दहा लाख खंडणीची मागणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : धायरी येथील एका शैक्षणिक संस्थाचालकाकडे दोघा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून, खंडणीविरोधी पथकाकडे केलेली तक्रार पाठीमागे घेण्यासाठी हातपाय तोडून गेम करण्याची धमकी दिली. ही घटना बेनकर वस्ती धायरी परिसरात 4 जुलै ते 28 नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी, सिंहगड रोड पोलिसांनी अक्षय रंगनाथ सावंत (वय 29, रा. धायरेश्वर विला, धायरी), प्रदीप अंकुश दोडके (वय 35, रा. दांगट पाटील नगर, वडगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत 47 वर्षीय संस्थाचालकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यांचे धायरी येथे प्री-स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. आरोपींनी याबाबत पुणे महापालिका येथील जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग पुणे जिल्हा परिषदेकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. तो अर्ज पाठीमागे घेण्यासाठी दोघांनी फिर्यादींकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती तीन लाख रुपये मागितले.

हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. ही बाब आरोपींना समजली. त्यांनी परत फिर्यादींना धमकावून 'तुला लय मस्ती आली आहे.. तू माझ्या विरुद्ध खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. तक्रार मागे घे, नाही तर तुझे हातपाय तोडून तुझा गेम करेन,' अशी धमकी दिली. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.

फिर्यादींच्या शैक्षणिक विद्यालयाचे बांधकाम सुरू होते. याबाबत आरोपींनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. तो अर्ज मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी करून धमकी देण्यात आली आहे. दोघा माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– श्रीकांत सावंत, पोलिस उपनिरीक्षक

हेही वाचा

SCROLL FOR NEXT