दिवसा रिक्षाचालक अन्‌ रात्री घरफोड्या; पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या | पुढारी

दिवसा रिक्षाचालक अन्‌ रात्री घरफोड्या; पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवसा रिक्षा चालविण्याच्या बहाण्याने बंद घरांची रेकी करून घरफोड्या करणार्‍या सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. अनिकेत भाऊराव गायकवाड (वय 21, रा. नवी सांगवी) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद (रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत गायकवाड हा मागील काही वर्षांपासून रिक्षा चालवितो. साथीदाराला प्रवासी म्हणून बसवून गायकवाड शहरात ठिकठिकाणी भाडे घेऊन गस्त घालत होता. भाड्याच्या निमित्ताने दिवसा पाहणी करून रात्री बंद घरे फोडत होता. खराडी परिसरात राहणारे फिर्यादी 14 नोव्हेंबर रोजी घर बंद करून मदुराईला गेले होते. यादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांचे घर फोडून लॅपटॉप, परदेशी चलन आणि नोटा अशी एकूण सव्वादोन लाखांची घरफोडी केली होती.

याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी परिसरातील सुमारे अडीचशे सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी रिक्षाचालकाला अटक केली. त्याच्याकडून रिक्षा जप्त केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक मनीषा पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, प्रमोद हंबीर, पोलिस अंमलदार, दिलावर सय्यद, शिवा धांडे, विकास कदम, सुभाष आव्हाड यांच्या पथकाने केली.

मोबाईल शॉपी फोडणारे चोरटे अटकेत

चंदननगर परिसरातील मोबाईल शॉपी फोडून विविध कंपन्यांचे मोबाईल चोरणार्‍या दोघांना चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मायकल नवनाथ कांबळे (वय.20) ,शिवा गोविंद चव्हाण (वय.19, दोघेही रा. गोकुळनगर नगर, कात्रज ) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. पोलिस अंमलदार विकास कदम, सूरज जाधव आणि श्रीकांत कोद्रे यांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतीने आरोपींना अटक केली.कांबळे आणि चव्हाण हे दिवसा फिरून पाळत ठेऊन रात्रीचे वेळी घरफोडी करत असत. त्यांच्याकडून 1 मोबाईल आणि 2 टॅब असा 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या दोघांकडे चोरीचे 4 मोबाईल मिळून आले असून, त्याचा तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button