

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'माझ्या सोशल मीडिया प्रतिनिधींनी दिवाळीत पाडव्याच्या दिवशी फेसबुकवर चित्र आणि शुभेच्छा असणारी पोस्ट केली होती. मला ती पोस्ट संध्याकाळपर्यंत माहीत नव्हती. संबंधित व्यक्ती माझ्या टीममधील प्रतिनिधींना ओळखतात. त्यांनी थेट चूक लक्षात अणून दिली असती तर लगेच दुरुस्त करता आली असती. मात्र, त्याऐवजी अश्लील कमेंट करण्यात आल्या. विचारांचा विरोध विचारांनी करा. अश्लील टीका खपवून घेतली जाणार नाही,' अशी टिपण्णी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.
चाकणकर म्हणाल्या, 'मी 18-19 वर्षांपासून राजकारणात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर अश्लील लिखाण होत आहे. आपल्यावर कारवाई होत नाही अशा समजातून अशा विकृत लोकांचे धाडस वाढत आहे. राज्यातील महिलांनीही असे प्रकार खपवून घेऊ नयेत आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी.'
'सोशल मीडियावरील एखाद्या पोस्टबद्दल आक्षेप घेण्याबाबत काही म्हणणे नाही. चुकीला चूक म्हटले पाहिजे. मी राजकारणात नवीन नाही. इतकी वर्षे विचारांची लढाई विचारांनी लढत आले आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या पोस्टच्या खालील कमेंट अश्लील स्वरुपाच्या आणि एकमेकांना प्रोत्साहन देणार्या होत्या. त्यातील काही व्यक्तींना मी फोन केले. त्यातील काहींनी माफी मागितली आणि कमेंट डिलिट केली. तुम्ही अश्लील कमेंट केली नसेल तर डिलिट का केल्या', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा