पुणे

कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; असे आले होते वीरमरण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहीद कर्नल (निवृत्त) वैभव अनिल काळे (वय 46) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमीत (धोबीघाट) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहीद कर्नल वैभव काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. भारतीय सैन्याच्या वतीने दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आर. एस. सुंदरम यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद कर्नल वैभव काळे यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

याप्रसंगी वैभव काळे यांची आई रचना काळे, पत्नी अमृता काळे, भाऊ विंग कमांडर अक्षय काळे आणि सासरे कर्नल (नि.) विवेक खैरे उपस्थित होते. माजी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल (नि.) नोबेल थंबुराज, सैनिक कल्याण विभागाचे संचालक बि—गेडिअर (नि.) राजेश गायकवाड, उपसंचालक लेफ्टनंट कर्नल (नि.) आर. आर. जाधव, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) एस. डी. हंगे, लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकही उपस्थित होते. सियाचीन, कारगीलजवळील द्रास, संयुक्त राष्ट्र शांतिसेनेत काँगो, ईशान्य भारत येथील सेवांसह पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्यावेळी तुकडीचे नेतृत्त्व त्यांनी केले.

एनडीएचे विद्यार्थी ते कमांडिंग ऑफिसर

कर्नल काळे 2000 मध्ये 'एनडीए' आणि त्यानंतर 'आयएमए'मार्फत लष्कराच्या पायदळात रुजू झाले. 11 जम्मू-काश्मीर रायफल्स या तुकडींतर्गत त्यांनी याआधी विविध आघाड्यांवर सेवा दिली. याच तुकडीचे त्यांनी कमांडिंग ऑफिसर म्हणून नेतृत्वही केले. 2022 मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र अंतर्गत 'यूएनडीएसएस'मध्ये सेवा सुरू केली. त्यांचे पहिलेच पोस्टिंग गाझापट्टीत राफा येथे होते.

असे आले वीरमरण

'हमास' विरुद्धच्या युद्धात इस्रायलकडून राफावर भीषण बॉम्बवर्षाव व गोळीबार सुरू होता. तिथेच गेल्या महिन्यात 12 एप्रिलला वैभव काळे यूएन निरीक्षक म्हणून रुजू झाले. सोमवारी त्यांना वीरमरण आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT