पुणे : पुढारी वृत्तसेवा
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी रेल्वेस्थानकासमोरील अरुंद रस्त्याच्या रुंदीकरणास संरक्षण विभागाने गुरुवारी पुणे महापालिकेला परवानगी दिली. त्यामुळे खडकीतील या रस्त्यावरील गेल्या अनेक वर्षांची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.संरक्षण विभागाकडून साडेदहा एकर जागा मिळणार आहे. त्यामुळे हा 2.2 किलोमीटर लांबीचा रस्ता सध्याच्या 21 मीटरऐवजी 42 मीटर रुंद होईल. मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यापासून गेली सहा वर्षे या रस्तारुंदीकरणाच्या परवानगीसाठी महामेट्रो आणि महापालिका प्रयत्नशील होती. मेट्रोचे काम व रस्तारुंदीकरण एकाचवेळी व्हावे, यासाठी तत्कालीन खासदार अनिल शिरोळे आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी संरक्षणमंत्र्यांसोबत अनेकदा बैठक घेतली, निवेदनेही दिली.
मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने मेट्रो प्रकल्पाला संरक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी परवानगी दिली. मात्र, महापालिकेला परवानगी मिळाली नव्हती. त्या बदल्यात तेथे शंभर कोटी रुपये खर्चून पूल बांधण्याची अट संरक्षण विभागाने घातली होती. आता तेवढी जागा देण्याच्या बदल्यात रस्तारुंदीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापासून (सीओईपी) हॅरिस पुलापर्यंतचा 5.7 किलोमीटर लांबीचा रस्ता 42 मीटर रुंदीचा होईल. सीओईपी ते रेंजहिल्स चौकादरम्यानचा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता 42 मीटर रुंदीचा आहे. तेथून खडकी हद्दीतील 2.2 किलोमीटर लांबीचे रुंदीकरण आता करण्यात येईल.
त्यानंतर बोपोडीतील उर्वरित रस्त्याचे काही काम झाले आहे, तर थोड्या जागेचा ताबाही महापालिकेला लवकरच मिळणार आहे. हॅरिस पुलानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दहा लेनचा रस्ता झाला आहे. त्यामुळे तेथे बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग बनविला आहे. सीओईपीपासून हॅरिस पुलापर्यंत बीआरटी बससेवेसाठी रस्त्याच्या मध्यभागी स्वतंत्र मार्गही आखण्यात आला आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागा त्यासाठी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे रेंजहिल्स येथे बसथांब्यासाठी पाया घेण्यात आला. मात्र, ते काम महापालिकेच्या अधिकार्यांनी थांबविले. या रस्त्याचे रुंदीकरण व बीआरटीसाठी संरक्षण विभागाने ही जागा दिली आहे. बीआरटीबाबत पुणे महापालिका काय निर्णय घेते ते पाहावे लागेल.
रस्त्याच्या मध्यभागी बीआरटीच्या दोन लेन, दोन्ही बाजूला सर्व वाहनांसाठी प्रत्येकी दोन लेन, तर कडेला साडेचार मीटरचा सेवारस्ता, पदपथ व सायकल ट्रॅक, अशी योजना येथे केलेली आहे. महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. आर. कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, 'या रस्त्याचे काम करण्याचे आदेश पूर्वी दिले होते. त्यात सुधारणा करावी लागेल. संबंधित ठेकेदार तयार झाल्यास रस्तारुंदीकरणास लगेच सुरुवात होईल; अन्यथा नवीन निविदा काढाव्या लागल्यास तीन महिन्यांनी प्रत्यक्ष काम सुरू होईल. मार्गातील जलवाहिनी व अन्य वाहिन्या महापालिका बदलणार आहे. अन्य खर्च महामेट्रोतर्फे करणार आहे.'
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामुळे हा रस्तारुंदीकरणाचा प्रश्न सुटला. ते पूर्वी पुणे महापालिकेचे आयुक्त होते. त्यांनी संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेली राज्य सरकारची येरवडा येथील साडेदहा एकर जागा संरक्षण विभागाला दिली व त्या बदल्यात रस्तारुंदीकरणासाठी जागा मिळवली. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेने संरक्षण विभागाला पाठविण्यात आला. त्यामुळे महापालिकेला रस्तारुंदीकरणाची परवानगी मिळाली.
हेही वाचा :