रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोकणात वाया जाणार्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी आता कृषी सिंचन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत सुक्ष्म सिंचन योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेल्या खर्च मर्यादांमध्ये 10 ते 13 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना वाढीव अनुदान देण्यात येणार आहे. ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासाठीची खर्चमर्यादा व त्यावर द्यायचे अनुदान हे 2016 मध्ये निश्चित केले होते. यामध्ये बदल करावा, अशी मागणी राज्यातील ठिबक उद्योग कृषी विभागाकडून सातत्याने होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्यामध्ये बदल केले आहेत.
1.2 मीटर या लागवड अंतरासाठी एक ट्रॅक्टर व ठिबक संच बसवल्यास 2016 च्या नियमावलीनुसार एक लाख 12, 236 रुपये अनुदान मिळत होते. आता नवीन नियमावलीनुसार हे अनुदान एक लाख 27 हजार पाचशे एक रुपये मिळेल. तुषार सिंचनासाठी 2016 च्या नियमावलीनुसार एक हेक्टरसाठी 19 हजार 542 रुपये अनुदान मिळत होते. आता नवीन नियमावलीनुसार याचा अनुदान 21 हजार 558 रुपये मिळेल. परंतु यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी 55 टक्क्यांपर्यंत व इतर शेतकर्यांसाठी 45 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची सुविधा कायम करण्यात आली आहे.
या सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेत पर्यायी सामग्रीला देखील अनुदान मिळते. म्हणजेच खत टाकी, कचरा गाळणी, माती व अन्य जड घटक वेगळे करणारे उपकरण या प्रकारची पर्यायी सामग्रीपूर्वी केंद्राचे अनुदान कक्षेत होती. परंतु आता नवीन नियमानुसार सॅण्ड फिल्टर, हायड्रो सायक्लोन फिल्टर, फर्टिलायझर्स टॅक व ठिबक नळी गुंडाळणारी अवजारे देखील आता या अनुदान कक्षात आले आहे.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र या विभागातील छोटे शेतकरी अर्ध्या एकरामध्ये देखील ठिबक सिंचन बसवतात. परंतु पूर्वीच्या नियमावलीमध्ये छोट्या अंतरासाठी अनुदानाची तरतूद नव्हती. त्याला देखील केंद्राने मान्यता दिली असून आता नवीन अनुदान नियमावलीत दीड मीटर बाय दीड मीटर असे नवे अंतर ग्राह्य धरण्यात आल्यामुळे आता छोट्या शेतकर्यांना देखील एक लाख 21 हजार 556 रुपये हेक्टरी एवढे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.