सांगली : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस | पुढारी

सांगली : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

सांगली ः पुढारी वृत्तसेवा सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस पडला. सांगली शहरात तासभराच्या पावसाने सर्वत्र पाणी साचले. दुष्काळी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. हा पाऊस खरीपपूर्व मशागतींना उपयुक्‍तठरणार
आहे. गेली चार महिने जिल्हा 40 ते 41 अंश तापमानाने होरपळून निघत आहे. दोन-तीन उन्हाळी पाऊस पडले. पण त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला नाही. यामुळे पिके करपली. बागायती व उन्हाळी पिकांना याचा मोठा फटका बसला. मागील आठवड्यापासूनही पारा चाळिशीच्या आसपास होता.

हवामान खात्याने यंदा मान्सून दहा ते 15 दिवस अगोदर दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. याचा परिणाम जिल्ह्यात काहीप्रमाणात दिसत होता. मागील चार दिवसांपासून वातावरण ढगाळ झाले आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पडत होत्या. हवामान खात्याने या आठवड्यात चार-पाच दिवस पाऊस असल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. त्यानुसार आज जिल्ह्यात दिवसभर वातावरण ढगाळ होते, पण उष्मा होता. सायंकाळी पाच-सहा वाजण्याच्या सुमारास सांगली, मिरज शहरात ढगांची दाटी होऊन विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे कार्यालयातून घरी जाणार्‍या कर्मचार्‍यांचे हाल झाले.

स्टेशन चौक, मारूती चौक, शंभर फुटी रोड यासह अन्य ठिकाणी पाणी साचले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. शिराळा, इस्लामपूर, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, मिरज पूर्व, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यात ठिकठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

खानापूर तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस

विटा : खानापूर तालुक्यात गुरुवारी मान्सूनपूर्व चांगला पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसाने विटा शहरातील बाजाराची दाणादाण उडवून दिली. तालुक्याच्या पूर्वेकडून आलेला पाऊस तालुक्यातील गार्डी, माहुली, लेंगरे, साळशिंगे, भांबर्डे, रेणावी, रेवणगाव, खानापूरसह घाटमाथ्यावरील करंजे, सुलतानगादे, बेणापूर अशा सर्वच ठिकाणी झाला आहे. रस्ते, गटारीतून पाणी तुडुंब भरून वाहत होते. हा पाऊस पिकांना पोषक आहे. विशेषत: भाजीपाला आणि वांगी, दोडका, टोमॅटो फळभाजांनाही पूरक आहे.
सोनीसह परिसरात वादळी पाऊस

सोनी : मिरज तालुक्यातील पूर्वभागात सोनीसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोनीसह परिसरातील भोसे, करोली (एम), पाटगाव परिसरात पाऊस झाला. जवळपास पाऊणतास पडलेला पाऊस खरीपपूर्व मशागतींना उपयुक्‍त आहे.

जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस

जत शहर : जत, कवठेमहांकाळ, आटपाडी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. उन्हाच्या तडाख्यात उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने गारवा मिळाला. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. जत शहरासह तालुक्यातील देवनाळ, मेंडिगिरी, उंटवाडी, रावळगुंडवाडी, मुचंडी, अमृतवाडी, पाच्छापूर या परिसरात चांगला पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी या पावसाने सुखावला आहे.

तासगाव शहरात वादळी पाऊस

तासगाव : तासगाव शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सायंकाळी चारनंतर अचानक अंधारून आले. वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गेली दोन दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण होते. जोरदार वारे सुटल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सायंकाळी उशिरापर्यंत कोठेही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नाही.

हेही वाचलतं का?

Back to top button