पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारागृहातील दिवाळी फराळ खरेदीत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
कारागृहाचे तत्कालीन अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हा भ्रष्टाचार केल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे.(Latest Pune News)
दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना गुप्ता आणि सुपेकर यांनी तब्बल 1200 रुपये किलोने काजूकतली खरेदी केल्याचे दाखविले आहे. परंतु, प्रत्यक्षात कैद्यांना त्या दराची काजूकतली दिली गेली नाही, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
गेल्या दिवाळीत राज्यातील कारागृहांसाठी पाच कोटी रुपयांच्या फराळाची खरेदी करण्यात आली. त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सुपेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार सुरेश धस यांनीदेखील विविध आरोप केले आहेत.
शेट्टी नेमके काय म्हणाले?
शेट्टी यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात... राज्यातील कारागृहांत कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकार्यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले, त्या फराळाच्या साहित्याचे दर नामवंत मिठाई उत्पादकांच्या दरपत्रकाप्रमाणे होते.
प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला. या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती. गत दिवाळीत राज्यात जवळपास पाच कोटी रुपयांची खरेदी केली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया केली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे, यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे, हे लक्षात येईल.
सुपेकर म्हणतात : सर्व आरोप निरर्थक
कारागृहातील रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीसह दिवाळी फराळ खरेदी प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार राबविण्यात आली आहे. याबाबत आम्ही पूर्वीच म्हणणे मांडले आहे. त्यामुळे आत्ताचे हे सर्व आरोप निरर्थक आहेत.