

पुणे: सुनेचा छळ केल्याप्रकरणी अमरावती कारागृहात असलेले गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्याकडे शशांक हगवणेचे मामा तत्कालीन तुरुंग उपमहानिरीक्षक व सध्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी गुन्ह्यातून मुक्तता होण्यासाठी 550 कोटींची खंडणी मागितली होती.
19 ऑगस्ट 2023 रोजी ही मागणी केली होती, असा आरोप गायकवाड याचे वकील अॅड. निवृत्ती कराड यांनी गुरुवारी केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याबाबत त्यांनी म्हणणे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Pune News)
शिवाजीनगरमधील जिल्हा व सत्र न्यायालयात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. अॅड. कराड म्हणाले, गायकवाड यांच्या कुटुंबावर चार मोक्का लावले आहेत. येरवडा कारागृहात असताना 75 वर्षीय गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता. यावेळी, सुपेकर हे पुण्यात वरिष्ठ अधिकारी होते.
यादरम्यान, गायकवाड यांची रवानगी अमरावती कारागृहात केली. त्यानंतर, 19 ऑगस्ट 2023 रोजी सुपेकर यांनी एसपी चिंतामणी यांच्यासमवेत अमरावती कारागृहास भेट दिली. सकाळी नऊच्या सुमारास दिलेल्या भेटीदरम्यान गायकवाड यांना विशेष कक्षात बोलवण्यात आले. यावेळी, त्यांना धमकाविण्यासह मारहाण करण्यात आली.
तू दीड हजार कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्या संपत्तीसाठी चार मोक्के लावले आहेत. त्यातून तुला सुटका करायची असेल तर 550 कोटी रुपये दे. मी यातून तोडगा काढतो, असे सुपेकर म्हणाल्याचे अॅड. कराड यांनी सांगितले. त्यानंतर गायकवाड घाबरले होते. जेल मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती वकिलांना दिली.
सुपेकरांनी कारागृहाला भेट कशी दिली याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत वकिलांनी माहिती मागविल्यानंतर समाधानकारक माहिती मिळाली नाही. तसेच, याप्रकरणात ज्यांनी माहिती सांगितली त्यांना धमकावले. तसेच, सात जणांना किरकोळ कारणावरून सस्पेंड केल्याची माहितीही अॅड. कराड यांनी दिली.
गणेश आणि नाना गायकवाड या दोघांवर वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 13 गुन्हे दाखल आहेत आणि 3 मकोका कारवाई आहेत. गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत असून कुटुंबातील इतर महिला सदस्यांना जामीन मंजूर केला आहे.
सुनेच्या छळप्रकरणी बाप-लेक तुरुंगात
पुण्यातील नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश हे सावकार आहेत. दोघेही सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरून गेली काही वर्षे तुरुंगात आहेत. मुलगा गणेश गायकवाडचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दीपक साळुंखे यांच्या मुलीसोबत म्हणजेच मुक्ता साळुंकेसोबत 2017 मध्ये लग्न झाले होते.
मात्र, मुक्ताचा हुंड्यासाठी छळ होत होता, त्यावरून 2018 मध्ये गायकवाड यांच्याविरोधात छळ केल्याबाबतची पहिली तक्रार दिली होती. त्यानंतर 2021 मध्ये मुक्ता साळुंकेने पोलिसांकडे पेटवलेल्या सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी गायकवाड बाप-लेकांना अटक झाली होती.