

शिवाजी शिंदे
पुणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या राज्यातील तलाव, पुरातन विहिरी, बारव, कुंड आणि घाट अशा तब्बल 34 जलाशयांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाने पुढाकार घेतला आहे.
अहिल्यादेवी यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक जलसंपत्तीचे जतन करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांनी उभारलेले तलाव, घाट, कुंड, विहिरी, बारव यांची दुरुस्ती करणे, तलावातील गाळ काढणे, यासह संपूर्ण जलाशयांचे पुनरुज्जीवन करून त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
त्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. शासनाने केलेल्या सर्वेक्षणात 34 जलाशये निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये तीन तलाव, 19 बारव, 6 विहिरी, 6 घाट, यांचा समावेश आहे. यासाठी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेत बांधकामांच्या मूळ सौंदर्यास बाधा पोहचणार नाही, यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेण्यात येणार आहे.
जिओ टॅगिंग करणार
ही कामे पाच टप्प्यांत होणार असून, त्याचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणच्या कामाचे तीन मिनिटांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. या वेळी जलसंधारणाचे अधिकारी, कंत्राटदार यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर गुणनियंत्रण तपासणी पथकाकडून कामाची तपासणी करण्यात येणार आहे.
प्राथमिक सर्वेक्षणात मंजूर कामे
ऐतिहासिक तलाव : चांदवड (जि. नाशिक), त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), मल्हार गौतमेश्वर जेजुरी (जि. पुणे)
बारव आणि विहिरी : वाफेगाव (सोलापूर), करमाळा (सोलापूर), माळशिरस (सोलापूर), लिंबगाव (सातारा), गुरसाळे-रामलिंग (सातारा), तुळजापूर (धाराशिव), शिरपूर (अहिल्यानगर), साखरगाव (नाशिक), घाटनदेवी (नाशिक), कसवे-ओझर (नाशिक), जामनेर-पाळधी (जळगाव), जेजुरी (पुणे), भीमाशंकर (पुणे), खंडोबा मंदिर (जालना), वेरुळ (छत्रपती संभाजीनगर), अंबेजोगाई (बीड), चांदवड रंगमहाल (नाशिक), वेल्लूर (परभणी).
घाट : चंद्रभागा घाट (पंढरपूर), चौंडी (जामखेड-अहिल्यानगर), पैठण (छत्रपती संभाजीनगर), बिंदुसरा (बीड), गोदावरी (नाशिक), पुणतांबा घाट (अहिल्यानगर).
कुंड : रावेर-केशवकुंड (जळगाव), घृष्णेश्वर-वेरुळ (छत्रपती संभाजीनगर), हरिहरेश्वर (बीड), त्र्यंबक (नाशिक), सप्तशृंगी गड (नाशिक), मसवे कुंडे (जळगाव).
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त लोककल्याणकारी निर्णय शासनाने घेतला असून, 6 मे रोजी चौंडी येथे मंत्रिमंडळ परिषदेची बैठक झाली, तीत हा निर्णय घेतला.
- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता,अवर सचिव, मृद व जलसंधारण विभाग