पुणे

पुणे : बाधित दर 23 वरून 13 टक्क्यांवर; सक्रिय व दाखल रुग्णसंख्याही घटतेय

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्णसंख्येचा बाधित दर दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर शहरातील नवीन रुग्णसंख्या, रुग्णालयात दाखल रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णसंख्याही घटत आहे. कोरोनाचा बाधित दरही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा दर 23 टक्क्यांवरून 13 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे उतरणीला लागली आहे.

डिसेंबरच्या मध्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या ओमायक्रॉन विषाणूमुळे वाढत होती. जानेवारीमध्ये तर ही संख्या उच्चबिंदूवर होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या ही 8 हजारांच्या दरम्यान आली होती. त्या वेळचा बाधित दर हा 40 टक्क्यांच्या दरम्यान होता. मात्र, जानेवारीच्या शेवटी ही रुग्णसंख्या सातत्याने कमी होत गेली आणि आता ती हजाराच्या आत आली आहे. म्हणजेच बाधित दरही केवळ 13 टक्क्यांवर आला आहे. सक्रिय रुग्णसंख्या आठवड्याभरात 13 हजारांनी कमी शहरात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या अवघ्या सात दिवसांत 13 हजारांनी कमी झाली आहे.

1 फेब्रुवारीला शहरात एकूण सक्रिय रुग्णसंख्या ही 26 हजार 712 इतकी होती. त्यानंतर डिस्चार्ज होणार्‍यांची संख्या जास्त आणि नवीन रुग्णांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आपोआप कमी होत गेली. सध्या शहरात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 13 हजार इतकी आहे. त्याचप्रमाणे 1 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 1,197 होती. ती आता 852 वर आली आहे.

Chart

पालिकेला कोव्हॅक्सिनचे दहा हजार डोस

पुणे शहराला कोव्हॅक्सिनचे 10 हजार डोस मिळाले आहेत. यापैकी पाच हजार डोस शुक्रवारी (दि. 4), तर उरलेले पाच हजार रविवारी (दि. 6) मिळाले आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेने दिली. सध्या शहरात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस देण्यात येत आहेत. यामध्ये कोविशिल्डची केंद्रे 140 आहेत आणि कोव्हॅक्सिनची 40 केंद्रे आहेत. यामध्ये दररोज 100 जणांना लस देण्यात येते. 18 वर्षे व त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येत असून 15 ते 17 वयोगटातील मुलांनाही कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.दरम्यान शहराला 18 जानेवारीपासून कोव्हॅक्सिनचा साठाच उपलब्ध झाला नव्हता. आता साठा पुरेशा
प्रमाणात असून ही लस 40 केंद्रांवर देण्यात येत आहे.

शहरात प्रथमच रुग्णसंख्या हजाराच्या आत

तिसरी लाट सुरू झाल्यापासून पुणे शहरात प्रथमच कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या आत आली आहे. सोमवारी शहरात केवळ 776 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी शहरात 800 च्या आत कोरोनाची रुग्णसंख्या ही 3 जानेवारीला आढळली होती. ती 444 इतकी होती. त्यानंतर दुस-याच दिवशी 4 जानेवारीला ती 1104 झाली आणि त्यानंतर ती दोन हजार व पुढे दिवसाला आठ हजारांवर गेली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र, ही रुग्णसंख्या उतरणीला लागली आणि आता तिस-या लाटेत सर्वांत कमी म्हणजे 776 वर खाली आली आहे.

दरम्यान, रविवार असल्याने कमी झालेल्या चाचण्या हा एक घटक यामध्ये असला तरी ही रुग्णसंख्या सातत्याने कमी होत जाईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तिस-या लाटेनंतर कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ही हजारांच्या आत येण्याची पहिलीच वेळ आहे. आजचा बाधित दर हा 13 टक्के इतका आहे जो आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. कोरोनाची रुग्णसंख्या ही याआधी स्थिर होती; मात्र आता ती उतरणीला आणि पर्यायाने लाट उतरणीला लागल्याचे हे चिन्ह आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

कोरोना रुग्णवाढीचा दर पाहता आता तो उतरणीला लागला असून, एकंदरीत तिसरी लाट उतरणीला लागल्याचे दिसून येते. याआधी रुग्णवाढीचा दर स्थिर होता. मात्र, आता तो कमी झाला आहे. दरम्यान, रुग्ण दाखल करण्याचे प्रमाण किंचित वाढलेले दिसून येत आहे. पूर्वी हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत 4 टक्के होते ते आणि सहा टक्क्यांवर आल्याचे दिसून येते. मात्र, येत्या आठ ते पंधरा दिवसांत तेदेखील कमी होईल.
– डॉ. संजीव वावरे, साथरोग विभाग प्रमुख, पुणे महापालिका

SCROLL FOR NEXT