Corn Cob Pudhari
पुणे

Pune Corn Cob Demand: पावसाने वाढवली मक्याच्या कणसांची मागणी; पुण्यात दरही वधारले

पर्यटनस्थळांकडे पुणेकरांचा ओढा; घाऊक बाजारात किलोला १८, किरकोळमध्ये कणसाला ३० रुपयांपर्यंत दर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसांच्या सरी कोसळत आहे. यामुळे पुणेकरांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहे. त्यामुळे बाजारात मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे.

मान्सूनच्या आगमनानंतरही पाठ फिरवल्याने कणसाच्या किलोला १२ ते १५ रुपये मिळणारे दर मान्सून सक्रिय होताच १५ ते १८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर, किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांना कणसाची विक्री करण्यात येत आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात खेड, मंचर, नारायणगाव येथून दररोज ३८ ते ४० किलोच्या अडीच हजार गोण्यांची आवक होत आहे.

घाऊक बाजारात प्रतिकिलोस १५ ते १८ रुपये दर मिळत आहे. दर वर्षीच पावसाला सुरुवात झाल्यानंतर मक्याच्या कणसांना विक्रेत्यांकडून मागणी वाढत असते. यंदा मान्सून दाखल झाल्यानंतरही पाऊस नसल्याने शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरविली होती.

मात्र, पावसाला सुरुवात होताच चित्र बदलले आहे. सद्य:स्थितीत खेड, मंचर, नारायणगाव, बारामती, सोलापूर, नाशिक, सातारा आणि कोकणातून मक्याच्या कणसांना मागणी होत असल्याचे व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.

शहरातील प्राणी संग्रहालय, सारसबाग, पर्वती, शनिवारवाडा, संभाजी उद्यान, पेशवे उद्यान, पु.ल. देशपांडे उद्यान आदी पर्यटन स्थळी खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडूनही मक्याच्या कणसांना मागणी वाढत आहे. येत्या काळात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मक्याच्या कणसांच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT