पुणे: कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून व्यावसायिकांना शिवीगाळ करत राडा घालणाऱ्या कॉप्स-24 च्या चार बीट मार्शलना निलंबित केले आहे. हे चौघे बीट मार्शल गुन्हे शाखेच्या अंतर्गत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नेमणूकीस होते. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे, कैलास शेषराव फुपाटे अशी निंलबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
मंगळवारी (दि.11) हे चौघे पोलिस विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात कॉप्स-24 बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असतानाच त्यांनी मद्यप्राशन केले होते. आळंदी रोड पोलिस चौकीच्या हद्दीत त्यांनी राडा घातला. आम्ही पोलिस आहे, आमचे कोणी काही करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करून देणार नाही, असे बोलून गैरवर्तन करत शिवीगाळ केली.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर नागरिक आणि व्यावसायिकांनी पोलिस चौकीला धाव घेतली. त्यांनी या चौघा पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा पाढा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्यासमोर वाचला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता हजेरीवर याबाबत चौघांना वरिष्ठांनी विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अनिल पाडेकर यांनी पोलिस ठाणे दैनंदिनीत यांच्या गैरकृत्याची नोंद घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश हांडे यांनी या चौघांचा कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या अगोदर हडपसरचे दोघे मार्शल निलंबित
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ‘डायल 112’ वर प्राप्त झाल्यानंतरही त्या ठिकाणी वेळेत न पोहचता पोलिसी जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या कॉप्स-24 च्या दोन बीट मार्शलला पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी निलंबित केले आहे. मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
कॉप्स-24 चे भलतेच उद्योग?
पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी पेट्रोलिंग व्हावे, नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कॉप्स-24 हा उपक्रम शहरात सुरू केला. पोलिस ठाण्यातील पूर्वीची बीट मार्शल ही यंत्रणा बंद करून त्या ठिकाणी गुन्हे शाखेअंतर्गत कॉप्स-24 हे बीट मार्शल देण्यात आले, परंतु काही बीट मार्शलचे भलतेच उद्योग मागील काही दिवसांत समोर येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत 9 कॉप्स-24 च्या बीट मार्शलला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. या बीट मार्शलचे नियंत्रण गुन्हे शाखेकडे असल्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांचे काय चालले आहे, याची अनेकदा माहिती नसते. तर दुसरीकडे हे बीट मार्शल देखील त्यांचे कष्ट घेताना दिसून येत नाहीत.
कॉप्स-24 पोलिसांची लाचखोरी
एवढ्या रात्री काम का सुरू ठेवले आहे, तुमच्याबाबत डायल 112 वर तक्रार आली आहे, असे सांगून पाषाण येथील सोसायटीच्या अध्यक्षाकडून 3 हजार रुपयांची लाच कॉप्स-24 बीट मार्शलनी घेतली होती. पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांनी या प्रकरणी तीन पोलिसांना निलंबित केले होते. हे तीनही पोलिस कर्मचारी गुन्हे शाखेच्या कॉप्स-24 बीट मार्शल म्हणून बाणेर पोलिस ठाण्यात त्यावेळी कार्यरत होते.
समज दिल्यानंतरही सुधारणा नाही
कॉप्स-24 चे बीट मार्शल जरी एखाद्या पोलिस ठाण्यात नेमणूकीस असले तरी त्यांच्यावर गुन्हे शाखेचे नियंत्रण आहे. निलंबित करण्यात आलेल्या या चौघा बीट मार्शलला अनेकदा समज देण्यात आली होती. नेमणूक दिलेले काम न करणे, हजेरीला उपस्थित न राहणे, कामचुकारपणा करणे अशी कृत्य त्यांनी यापूर्वी देखील केली. दरम्यानच्या कालावधीत त्यांना अनेकदा समजदेखील देण्यात आली. परंतु, त्यांच्या वर्तनात काही फरक पडलेला दिसून आला नाही. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी यातील दोघांचा कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता.