वातावरण थंड अन् प्राण्यांचे कुलर बंद Pudhari
पुणे

Rajiv Gandhi Zoo: वातावरण थंड अन् प्राण्यांचे कुलर बंद

प्राणिसंग्रहालयातील कुलर, फॉगर बंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात ऐन मे महिन्यात कमाल तापमानाचा पारा 42 वरून चक्क 32 अंशांवर खाली आल्याने कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची असह्य उकाड्यातून सुटका झाली आहे. त्यामुळे गेले दोन महिने सुरू असलेले कुलर, फॉगर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभर गार वारे सुटल्याने प्राणी आनंदाने बागडत होते. ते पाहण्यासाठी दुपारी 3 ते 6 पर्यंत त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

शहरात यंदा कमालीचा तापदायक उन्हाळा पुणेकरांनी अनुभवला. मार्च ते एप्रील असा सलग साठ दिवस कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर होता. या साठ दिवसांत एकदाही पाऊस झाला नाही. (Latest Pune News)

त्यामुळे उष्मा प्रचंड जाणवत होता. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघ, सिंह, अस्वल, बिबट्या या हिस्र प्राण्यांसह बहुतांश पिंजर्‍यातील प्राण्यांना पंखे, कुलर आणि फॉगर खाली ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या चोवीस तासांत शहराचे कमाल तापमान 32 अंशांवर खाली आल्याने आता फक्त पंखे सुरू असून, कुलर अन् फॉगर बंद करण्यात आले आहेत. तापमानाचा पारा खाली आल्याने येथील पर्यटकांची संख्याही दुपटीने वाढली आहे.

तापमानात घट होताच गर्दी वाढली...

गेले दोन महिने फक्त सायंकाळी या ठिकाणी थोडीफार गर्दी होती. कारण उकाडा प्रचंड होता. पर्यटकांसह, शहरातील नेहमी येणारे नागरिक उद्यानातील बॅटरी रिक्षाने फिरणे पसंत करीत होते. मात्र, बुधवारपासून शहराचा पारा खाली आला.

गुरुवारी तो 32.8 अंशांवर आला आणि दिवसभर गार वारे सुटल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाली. सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत प्राणिसंग्रहालय गर्दीने भरून गेले होते. सर्वच प्राणी आनंदाने बागडत होते. बिबटे, वाघ, सिंह, अस्वलांचे बागडताना दर्शन झाल्याने बच्चेकंपनी जाम खूष झाली होती.

संग्रहालयात एकूण 420 प्राणी...

या ठिकाणी एकूण 420 प्राणी आहेत. यात 100 चितळ, 45 काळविट, 3 वाघ, 3 सिंह, 2 बिबटे, दोन हत्तिणींचा समावेश आहे. यातील बहुतांश प्राणी जे पिंजर्‍यात आहेत, त्यांना कुलर आणि फॉगर लावण्यात आले होते. प्रामुख्याने वाघ, सिंह, बिबटे यांना कुलर, फॉगरची जास्त गरज पडली. मात्र, सध्या तिथे फक्त पंखे सुरू असून, कुलर, फॉगर बंद करण्यात आले आहेत.

आईस केक अन् इलेक्ट्रॉलचे डोस दिले...

अधिकार्‍यांनी सांगितले की, मार्च ते एप्रिलअखेरपर्यंत अस्वलांसाठी खास आईस केक बनवला गेला. यात विविध फळे बर्फात मिसळून त्याचा आईस केक केला जातो. तो अस्वलांना उन्हाळ्यात फार आवडतो. त्यामुळे त्यांना तो खाऊ दिला गेला. तसेच, इतर सर्वच प्राण्यांना इलेक्ट्रॉलचे डोस पिण्याच्या पाण्यातून दिले गेले. तसेच, व्हिटामिन सीचे डोस देखील दिले. त्यामुळे प्राण्यांना उष्माघाताचा त्रास झाला नाही.

आम्ही साधारणपणे 15 मार्चपासून 6 मेपर्यंत पंखे, कुलर आणि फॉगर प्राण्यांसाठी लावले होते. तसेच, त्यांना इलेक्ट्रॉलसह विविध व्हिटॅमिनचे डोस सुरू केले होते. मात्र, गेल्या चोवीस तासांत वातावरण बदलल्याने पन्नास दिवसांत प्रथमच कुलर आणि फॉगर बंद करावे लागले आहे. आता शहराचे तापमान 42 वरून 32 अंशांवर आल्याने प्राण्यांची उकाड्यातून काही काळ सुटका झाली आहे. तसेच, पर्यटकांची गर्दीही वाढली आहे.
- डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, कात्रज प्राणिसंग्रहालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT