

दिगंबर दराडे
पुणे: जिल्ह्यातील 20 हजार सातबारा उतार्यांवर मृत खातेदारांची नावे कायम आहेत. त्यामुळे वारसांना अनेक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी तलाठ्यांद्वारे गावनिहाय सर्व्हे करण्यात आला असून, ‘जिवंत सातबारा’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठीची फेरफार प्रक्रिया सुरू झाली असून, सातबारा उतार्यांवर मृत खातेदारांच्या जागी वारसांची नावे लागणार आहेत.
शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ‘जिवंत सातबारा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकार्यांकडून गावनिहाय सर्व्हे करण्यात आला. (Latest Pune News)
यामध्ये सातबारा उतार्यावरील 20 हजार 178 खातेदार मृत असल्याचे निदर्शनात आले आहे. या मृतांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार मिळावेत, यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (कूळ कायदा) नामदेव टिळेकर यांनी सांगितले.
वेळ अन् पैशाची बचत; कामेही होतात झटपट
या मोहिमेमूळे मृत खातेदारांच्या वारसाला फेरफारसाठी लागणारा वेळ व पैशाची बचत होत आहे. कमी अवधीत हक्काची शेतजमीन वारसाचे नावे होत असल्याने मोहीम कल्याणकारी ठरत आहे.
जिल्ह्यात फेरफारची प्रक्रिया गतिमान
या कालबद्ध मोहिमेसाठी तहसीलदार त्यांच्या तालुक्यासाठी समन्वय अधिकारी, तर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी नियंत्रण अधिकारी आहेत. जिल्ह्यात फेरफार नोंदीची कामे प्रगतिपथावर असल्याने मोहिमेची प्रक्रिया सुलभरीत्या होत असल्याचे वास्तव आहे.