पुणे: पावसाळ्यात पाणी वाहून जावे, यासाठी दरवर्षी पावसाळी वाहिन्या, नाले आणि ड्रेनेजची सफाई महापालिकेमार्फत केली जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये किमतीच्या निविदा काढल्या जातात. या वर्षीसुद्धा या निविदा काढण्यात आल्या आहेत.
मात्र, त्या नियोजित रकमेपेक्षा या निविदांची किमत 40 टक्क्यांनी कमी असल्यामुळे सफाईचा दर्जा राखला जाणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. हा प्रश्न आता खरा ठरला असून, अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्या व ड्रेनेज साफ करीत असताना काढलेली घाण तशीच शेजारी ठेवली जात आहे. त्यामुळे पावसाळापूर्व वाहिन्यांसह नालेसफाई निव्वळ कागदावरच होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेने या वर्षी पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता योग्य प्रकारे करण्यात यावी, यासाठी निविदा काढल्या होत्या.
महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले आणि पावसाळी वाहिन्या साफ करण्यासाठी या निविदा मागविण्यात आल्या होत्या. पावसाळापूर्व कामांसाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून नाले, पावसाळी गटारांची स्वच्छता करते, मात्र त्यानंतरही पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार गेल्या वर्षी घडले होते. (Latest Pune News)
या वर्षीसुद्धा या कामासाठी महापालिका प्रशासनाने पूर्वगणकपत्र तयार केले होते. त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा 45 ते 53 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी ठेकेदारांनी दाखविली होती. दरम्यान, शहरात या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, ही कामे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे.
ठेकेदार ड्रेनेजमधून काढलेली घाण ड्रेनेजशेजारीच टाकून ठेवत आहेत. ही घाण उचलून ती दुसरीकडे टाकण्यात यावी, अशी तरतूद निविदेत आहे. मात्र, ही घाण काढून ड्रेनेजशेजारीच टाकून दिली जात आहेत, त्यामुळे ही घाण पुन्हा ड्रेनेजमध्ये जात आहे.
ड्रेनेज सफाईची कामे व्यवस्थित व्हावी, यासाठी त्यातील माती, दगड त्वरित उचलावेत, असा आदेश पालिकेने संबंधित ठेकेदारांना दिला आहे, पण चार-पाच दिवस ड्रेनेजमधून काढलेली माती व घाण ही रस्त्यावरच पडून राहते. ती पुन्हा गटारात जाते किंवा रस्त्यावर पसरते. या संदर्भात मंगळवारी ठेकेदार व अधिकार्यांच्या बैठकीत सक्त ताकीददेखील देण्यात आली होती, तरीही शहरात अजूनही अनेक ठिकाणी पावसाळी गटारांच्या चेंबरच्या बाजूला माती पडून आहे. अशा बेजबाबदार ठेकेदारांवर कारवाई करणे अपेक्षित असताना पालिकेच्या मलनिस्सारण वभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
चेंबरमधील राडारोडा चेंबरच्याच काठावर
पुणे महापालिका ड्रेनेज विभागाच्या वतीने पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. पावसाळी चेंबर ड्रेनेजलाइन सफाई केल्यानंतर राडारोडा त्या, त्या चेंबरच्याच बाजूला टाकला जात आहे. हा राडारोडा हटवला जात नसल्याने याचा त्रास रस्त्यावरून जाणारी वाहने, वाटसरू यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. ही घाण पुन्हा त्याच ड्रेनेजमध्ये जात आहे. सदाशिव पेठ, नवी पेठ, लोकमान्यनगर, सिंहगड रोड येथे ड्रेनेजसफाई सुरू असून, काढलेला राडारोडा संबंधित ठेकेदार तिथेच ठेवून देत आहेत.
पावसाळी वाहिन्या सफाईचे 40 टक्के काम पूर्ण
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागामार्फत ड्रेनेज सफाईसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. संबंधित ठेकेदारांनी ड्रेनेज सफाईचे काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत 40 टक्के सफाईची कामे झाली असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
नालेसफाई, ड्रेनेजसफाई करताना संबंधित ठेकेदाराला काढलेली घाण उचलून दुसर्या ठिकाणी टाकल्याचे फोटो पालिकेला सादर करण्यास सांगितले आहेत. असे करणार्या ठेकेदारांनाच बिले अदा केली जाणार आहेत. त्यामुळे त्यांना हा कचरा उचलावा लागणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त