पुणे: वाकडेवाडी येथील एसटी स्थानकाबाहेरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुल कॅब टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. त्याकरिता एक थांबादेखील देण्यात आला आहे. आरटीएच्या (रिजनल ट्रान्स्पोर्ट अॅथोरिटी) नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
एसटी स्थानकाबाहेरून प्रवासी वाहतूक करायला यापूर्वी कूल कॅबला परवानगी नव्हती. यामुळे एसटीने वाकडेवाडी येथे बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना शहरात निश्चित ठिकाणी जाण्यासाठी कूल कॅबचा पर्याय उपलब्ध नव्हता. आता आरटीएच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे एसटीच्या प्रवाशांना कूल कॅबदेखील उपलब्ध होणार आहेत. यामुळे येथून प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (Latest Pune News)
कूल कॅब म्हणजे काय?
कूल कॅब ही एक टॅक्सी सेवा आहे, ती मुख्यतः महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये चालते. कूल कॅब ही सामान्य काळ्या-पिवळ्या टॅक्सींपेक्षा वेगळी आहे. कारण ती वातानुकूलित (एसी) असते.
कूल कॅबमध्ये ए.सी.च्या सोयीमुळे उन्हाळ्यात किंवा गर्दीच्या वेळी प्रवास अधिक आरामदायक होतो. सामान्य टॅक्सींच्या तुलनेत कूल कॅबचे भाडे थोडे जास्त असते. ही टॅक्सी बहुतेक वेळा पांढर्या, निळ्या किंवा इतर विशिष्ट रंगात असते. त्यामुळे त्या सामान्य टॅक्सींपेक्षा सहज ओळखता येतात.
पुण्यातील टॅक्सी थांबे
पुण्यात कूल कॅब या टॅक्सीसाठी फक्त पुणे विमानतळ आणि पुणे रेल्वे स्थानकावरच थांबे देण्यात आले आहेत. आता मात्र वाकडेवाडी एसटी स्थानकाबाहेरही या कूल कॅब टॅक्सीला अधिकृत थांबा मिळाला आहे. या गाड्या फक्त पुणे-मुंबई-पुणे अशीच सेवा पुरवितात, अशी माहिती आहे.
शहरात किती कूल कॅब?
2023-24 मध्ये 8 कूल कॅबची नोंदणी आरटीओत झाली होती.
2024-25 मध्ये फक्त 4 कूल कॅबची नोंदणी झाली आहे.
शहरातील एकूण कूल कॅबची नोंदणी 282 इतकी आहे.
वाकडेवाडी एसटी स्थानकावरील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, आरटीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. यामुळे प्रवाशांना येण्या जाण्यासाठी अधिकचा पर्याय उपलब्ध झाला असून, त्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.