संततधार पावसामुळे विषाणूजन्य आजारांचा वाढता धोका pudhari file photo
पुणे

Pune Dengue Cases: संततधार पावसामुळे विषाणूजन्य आजारांचा वाढता धोका

डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू अशा विषाणूजन्य आजारांचा धोका आणखी वाढला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळा सुरू झाल्यापासून विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून नागरिकांना फ्लूसदृश आजाराच्या साथीने हैराण केले. आता गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू अशा विषाणूजन्य आजारांचा धोका आणखी वाढला आहे.

खाजगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये दररोज विषाणूजन्य आजारांची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. ताप, अतिसार, अंगदुखी, उलट्या, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. (Latest Pune News)

लक्षणे काय?

चिकुनगुनियाचे सर्वांत प्रमुख लक्षण ताप हे आहे. या आजाराची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण त्यासोबत सांध्यांच्या तीव वेदना, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा ही देखील लक्षणे आहेत.

डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांमागे दुखणे ही लक्षणे आहेत. या शिवाय डेंग्यूमुळे रक्तस्त्राव होत असल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जात आहे.

काय काळजी घ्यावी?

सध्या मुलांमध्ये व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून पालकांनी दुर्लक्ष न करता मुलांनी विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते, यामुळे डेंग्यू व चिकनगुनिया हा आजार होतो.

डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करा, घराबाहेर पाणी साचू देऊ नका, परिसरात वेळोवेळी फवारणी करा आणि डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. म्हणून ताप जास्त दिवस असल्याने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांमध्ये फ्लूसदृश लक्षणे दिसून येत आहेत. दररोज बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येणारे बहुतांश रूग्ण हे ताप, सर्दी, खोकल्याचे असतात. या रुग्णांमध्येही गेल्या दोन आठवड्यांत 7 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिकांनी निष्काळजीपणा न करता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वेळीच निदान झाल्यास पटकन उपचार होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणून ताप आल्यास अंगावर न काढता वेळेवर चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशिय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT