पुणे

पुणे : गंगाधाम, सॅलीसबरी पार्कात आरक्षणानंतरच ठरणार दावेदार

अमृता चौगुले

रघुनाथ कसबे

पुणे / बिबवेवाडी : भाजपसाठी अनुकूल अशी रचना असलेल्या गंगाधाम-सॅलिसबरी पार्क या प्रभागात भाजपचे सहा विद्यमान नगरसेवक उमेदवारीचे दावेदार आहेत, तर विरोधी पक्षांकडे मात्र मातब्बर उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे भाजपसाठी अनुकूल रचना असली तरी उमेदवार ठरविण्याचे मोठे आव्हान असणार असून, आरक्षण सोडतीनंतरच उमेदवारीचे खरे दावेदार कोण हे ठरणार आणि कोणाला विस्थापित व्हावे लागणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

महापालिकेचे सध्याचे प्रभाग क्र. 28 व 36 हे दोन प्रभाग एकमेकांना जोडून गंगाधाम – सॅलिसबरी पार्क हा प्रभाग क्र. 40 नव्याने तयार झाला आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग 36 मधून विद्यमान आमदार सुनील कांबळे, अनसूया चव्हाण, मानसी देशपांडे व राजेंद्र शिळीमकर हे नगरसेवक निवडून आले होते, तर प्रभाग 28 मधून श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, प्रवीण चोरबेले व राजश्री शिळीमकर या निवडून आल्या होत्या. त्यामधील जवळपास सहा नगरसेवक प्रभाग क्र. 40 मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

भाजपसाठी उमेदवार निवडण्याची डोकेदुखी

त्यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक भिमाले, वैरागे, देशपांडे, शिळीमकर, आमदार कांबळे यांच्या जागी त्यांची कन्या प्रियांका कांबळे यांच्यासह आदित्य जागडे, विद्या जागडे यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. त्यात भिमाले यांचा सर्वाधिक भाग या प्रभागात आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर एक जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित असणार आहे. त्या जागी महिला एससी आरक्षण आल्यास वैरागे की कांबळे, असा पेच उभा राहणार असून एससी पुरुष आल्यास माजी नगरसेवक भरत वैरागे उमेदवार असण्याची शक्यता आहे. उर्वरित एका जागेचे आरक्षण खुला वर्ग की महिला यावर अवलंबून असून त्यावरच नगरसेविका देशपांडे आणि शिळीमकर यांचे भवितव्य ठरणार आहे. एकंदरीत भाजपसाठी हा प्रभाग उमेदवारी ठरविताना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

विरोधकांकडे नाही तगडा उमेदवार

सध्या तरी प्रभागात भाजपाला टक्कर देण्यासाठी मजबूत असा उमेदवार विरोधी पक्षांकडे दिसून येत नाही. पण जर महाविकास आघाडी झाली व झोपडपट्टीतील मते फिरली तर मात्र या प्रभागात भाजपला निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने भाजपामधून तिकीट न मिळालेले नाराज उमेदवार, कार्यकर्ते महाविकास आघाडीला साथ देऊ शकतात. त्यामुळे भाजपाला अंतर्गत नाराजांचादेखील सामना करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांमध्ये बापू तळेकर, योगेश पवार, रूपाली बिबवे, जयश्री त्रिभुवन, तर भारतीय काँग्रेस पक्षाकडून शिलार रतनगिरी, अविनाश गोतारणे, सादिक लुकडे, शिवसेनेकडून अरुण पाफळ, शशी पाफळ, एकनाथ ढोले, संतोष चव्हाण हे इच्छुक आहेत.

अशी आहे प्रभागरचना

बिबवेवाडी गावठाण, आई माता मंदिर परिसर, शंकर महाराज सोसायटी, वर्धमानपुरा सोसायटी, गंगाधाम फेज वन, फेज टू, डीएडी कॉलनी, बुर्‍हाणी कॉलनी, एकोपा सोसायटी, संदेशनगर, सॅलिसबरी पार्क, आनंद पार्क, मिरा सोसायटी इत्यादी.

  • लोकसंख्या : 59,882
  • अनुसुचित जाती : 8,046
  • अनुसूचित जमाती : 650

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT