पुणे

कंटेंट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जनजागृती करावी : पुनीत बालन

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदाराच्या एका मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा, यासाठी कंटेंट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जागृती करून देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे, असे आवाहन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केले. मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 'पुनीत बालन ग्रुप'च्या वतीने 'वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट'चे आयोजन केले होते, या वेळी ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंटेंट क्रिएटर उपस्थित होते.

सध्या सोशल मीडियाची ताकद प्रचंड असून, तरुणांसह सर्वच वयोगटांतील नागरिक सोशल मीडियाचा एक भाग बनले आहेत. या ताकदीचा वापर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मीडियातील कंटेंट क्रिएटर्सनी सक्रिय योगदान देण्याची गरज असल्याचे मत बालन यांनी व्यक्त केले. मोहोळ म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात आणि त्यावर उपाययोजनाही करता येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी काम करता येते. या वेळी त्यांनी मतदानाबद्दल जागृती करण्याचेही आवाहन केले.

मतदान जनजागृतीसाठी कंटेंट क्रिएटर्ससोबत सहभाग घेणार असल्याचे सांगत अभिनेते तरडे म्हणाले, चित्रपट पोहोचवण्यासाठी क्रियेटर्स यांची भूमिका सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. काही सेकंदाच्या कंटेंटमध्ये लोकांच्या चेहर्‍यावर हास्य आणण्याचे काम अवघड असते. परंतु, कंटेंट क्रिएटर्स आपल्या प्रतिभेतून आणि निरीक्षण शक्तीद्वारे हे काम सहज करू शकतात. असेच काम त्यांनी मतदानाबाबत जागृती करण्यासाठी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कंटेंट क्रिएटर्सनी लोकांमध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचे आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती केली, तर मतदानाचे प्रमाण वाढेल. मतदारांनीही मतदानाच्या दिवशी सुटी आहे म्हणून घरी न बसता जागरूक नागरिक म्हणून मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं.

– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT