पुणे

पुण्यात आघाडीसाठी काँग्रेसचा ‘हात’ पुढे?

backup backup

पांडुरंग सांडभोर

पुणे : महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले असले, तरी पुण्यात मात्र काँग्रेसने आघाडीसाठी हात पुढे केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. किमान 45 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, राष्ट्रवादीतून याला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशपातळीवर याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तरीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.

आता प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यावर पुन्हा आघाडी होणार की नाही, यासंबंधीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यात आता काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर नेत्यांची आणि इच्छुकांचाही आघाडी व्हावी, हीच मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. खासगीत तशी कबुलीही दिली जात आहे. मात्र, त्यापुढे जाऊनही काँग्रेसच्या काही मंडळींनी आघाडीसाठी राष्ट्रवादीकडे हात पुढे केला असल्याचे आता समोर आले आहे. त्यासाठी सर्वप्रथम 80 जागांची अनौपचारिक मागणी करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर 65 जागांची मागणी पुढे करण्यात आली. त्यालाही राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांची संख्या आणि गत निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवार यांची एकत्रित संख्या या सूत्रानुसार 26 ते 30 जागा देण्याचा पवित्रा घेतला. त्यावर आता काँग्रेसने किमान 45 जागा द्याव्यात, अशी मागणी केल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, यासंबंधीच्या मागणीला राष्ट्रवादीने दुजोरा दिला. मात्र, आघाडीचा निर्णय हा प्रदेश पातळीवरून होणार असल्याने सध्या दोन्ही पक्षांकडून 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

शिवसेनेचा निर्णय मुंबईतूनच

महापालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची तशी भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सेनेला पुण्यात किती जागा मिळणार, यासंबंधीचा निर्णय थेट मुंबईतूनच होईल, असे असेही स्पष्ट करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यात आघाडीसाठी काँग्रेसच्या स्थानिक आणि प्रदेशपातळीवरील कोणत्याही नेत्याने प्रस्ताव दिलेला नाही.
                                                                           – मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT