काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल  File photo
पुणे

Pune Crime News: काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून, दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर तिवारी यांचे मुरलीधर व्हेज हे हॉटेल आहे. त्याच्यापासून जवळच असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (दि. 5) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. (Pune Latest News)

स्वप्निल रामचंद्र मोरे (वय 34, रा. नारायण पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी गोपाळ शंकर तिवारी (वय 66, रा. घोले रोड, शिवाजीनगर), हर्ष ऊर्फ नन्नू शंकर शिर्के (वय 29, रा. नारायण पेठ), निखिल दिलीप जगताप (वय 33, रा. शनिवार पेठ), मुकुंद शंकर शिर्के (वय 27, रा. नारायण पेठ), अभिषेक उमेश थोरात (वय 22, रा. दत्तवाडी) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील हर्ष, निखिल, मुकुंद आणि अभिषेक या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर हॉटेलजवळील पूजा पेंटरच्या समोर सार्वजनिक रोडवर एक काळ्या रंगाचा बोर्ड लावला होता. तो काढण्यासाठी तिवारी आणि त्यांचे साथीदार तेथे आले. ते बोर्ड काढत असताना मोरे यांनी त्यांना तो काढू नका. तो बेकायदा असल्यास महापालिका काढून घेईल, असे म्हटले. त्या वेळी हर्ष याने मोरे यांना ’तू कोण मला सांगणार?’ असे म्हणत झटापट करून छातीत बुक्क्या मारल्या. हा प्रकार घडल्यानंतर मोरे यांनी पोलिस चौकीत याबाबत तक्रार दिली होती.

पोलिसांनी वैद्यकीय तपासणीची यादी देऊन त्यांना ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. मात्र, मोरे त्यानंतर पोलिस चौकीत आले नाहीत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

दरम्यान, रात्री पावणेनऊच्या सुमारास मोरे हे मित्रासह केळकर रोडवर मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी परत हर्ष, निखिल आणि त्यांचे इतर साथीदार दुचाकीवरून तेथे आले. हर्षने त्याच्याकडील कोयत्याने मोरे यांच्या बोटावर आणि पाठीवर वार केले, तर निखिलने लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करताच आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींच्या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुकुंद शंकर शिर्के (वय 27, रा. नारायण पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी स्वप्निल ऊर्फ बाबा मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांनी फिर्यादींचा भाऊ हर्ष शिर्के याच्याबरोबर झालेल्या वादातून त्यांना लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण केली. तसेच, त्यांचा मित्र निखिल जगताप याला लाथाबुक्क्यांनी मारहण केली आहे. आरोपींनी फिर्यादींना दगड फेकून मारले असून, गाडीचे दगडाने आणि लोखंडी रॉडने तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

घटनेशी काहीही संबंध नाही; आकस ठेवून गोवले!

नारायण पेठेतील निघोजकर मंगल कार्यालयाजवळ घडलेल्या या घटनेशी आपला अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात पोलिसांनीही आपल्याला अटक न करता केवळ समज देऊन सोडून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. नदीपात्रातील अतिक्रमणांविरुद्ध आपण कायमच आवाज उठविला आहे, तसेच ती काढण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच संबंधितांनी माझे नाव या प्रकरणात गोवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बोर्ड काढण्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आलेल्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, काही आरोपींना अटक केली आहे.
- संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT