

नगर : शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत धाडसी चोरी करून विमानाने बिहारला पसार होण्याच्या तयारीत असतानाच नगर पोलिसांनी पुणे विमानतळावरून तिघांना बेड्या ठोकल्या. या तिघांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बाजारपेठेतून धिंड काढली. (Ahilyanagar Latest Update)
मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला सफियाना शेख (रा.बौध्द नगर,पत्राशेड,पुणे), असफाक दिलशाद शेख (रा.ज्योतीबानगर, पिंपरी कॉलनी, पुणे) आणि निसार अली नजर मोहंमद (रा.तुलसीपुर, उत्तरप्रदेश, हल्ली वाघेश्वरनगर वाघोली,पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
रविवारी (दि.3) चितळे रस्त्यावरील लक्ष्मण राजाराम दुलम यांच्या डी.चंद्रकांत दुकानात चोरी करत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या दुकानाशेजारील हॉटेलमध्येही चोरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (2), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
बाजारपेठेतील चोरीच्या घटनेचे गांर्भीय पाहून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेचे विशेष पथक नियुक्त करत छडा लावण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रोहित येमूल, सागर ससाणे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भगवान धुळे, अर्जुन बडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत चोरट्यांचा मागमूस शोधला. नगरमध्ये चोरी करून तिघे आरोपी पुणे विमानतळावरून विमानाने बिहारला जात असल्याची माहिती मिळाली. कोणताही विलंब न करता नगरचे पोलिस पथक पुणे विमानतळावर पोहचले. विमानतळावरील ‘सीआयएसएफ’च्या निरीक्षक रुपाली ठोके आणि नियंत्रण कक्षातील दिपक वाघमारे यांच्या सहकार्याने पोलिसांनी तिघांना विमानतळावर बेड्या ठोकल्या.
पकडलेला आरोपी असफाक दिलशाद शेख याने त्याच्या बहीणीचे बँक खात्यावर एटीएम मशीनद्वारे ऑनलाईन 9 लाख 98 हजार रुपये वर्ग केल्याची कबुली पोलिस तपासात दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने नगरमधील गुन्ह्याची कबुली दिली.
पकडलेल्या तिघांना पोलिसांची चोरी केलेल्या दुकानात नेले. तेथे चोरीचे प्रात्यक्षिक करून घेतले. दुकानात कसे गेले, चोरी कशी केली, मुद्देमाल कसा लंपास केला हे आरोपींनी पोलिसाना प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर पोलिसांनी तिघांची बाजारपेठेत पायी फिरवत धिंड काढली.