वेल्हे : पर्यटकांसह हजारो नागरिकांची वर्दळ असलेला तसेच राजगड, मुळशी व हवेली तालुक्यांना जवळच्या अंतराने जोडणार्या पुणे - पानशेत रस्त्यावरील सोनापूर व रुळे गावच्या दरम्यान साडेपाच कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारलेला पूल व दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे भराव खचले आहेत. त्यामुळे या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. (Pune Latest News)
तीन वर्षांपूर्वी या पुलाला भगदाडे पडल्याने प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली होती. दळणवळण ठप्प पडल्याने नागरिकांचे हाल झाले. स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी याकडे विधीमंडळात शासनाचे लक्ष वेधले. तापकीर यांच्या प्रयत्नातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुसज्ज पूल व सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ता तयार करण्यासाठी साडेपाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले.
गेल्या वर्षी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात पूर्वीप्रमाणे पुलाचा भराव खचला. खडकवासला धरणाच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे पूल व दोन्ही बाजूंच्या रस्त्याला तडे गेले आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश निगडे म्हणाले, पूल व दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच खचलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर, पानशेत विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अंकुशभाऊ पासलकर यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना न केल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.