Pune Politics Pudhari
पुणे

Pune Politics: पुण्यात काँग्रेसने ‌‘भाकरी फिरवली‌’; पूर्व-पश्चिमसाठी स्वतंत्र शहराध्यक्ष

गटबाजी रोखण्यासाठी नवा फॉर्म्युला; पूर्व पुणे शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप, तर पश्चिम पुणे शहराध्यक्षपदी दीप्ती चवधरी यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने पुण्यात मोठे संघटनात्मक फेरबदल करत शहरासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पूर्व पुणे शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप, तर पश्चिम पुणे शहराध्यक्षपदी दीप्ती चवधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे दोघांनीही पुणे महापौरपद भूषविले आहे. याचबरोबर ग्रामीणण संघटनेतही बदल करण्यात आले असून पुणे ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्षपदी कमलाकर सातव, तर पुणे ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी लहू निवंगुणे यांची निवड केली आहे.

राज्यभर काँग्रेसकडून सुरू असलेल्या ‌‘संघटन सृजन‌’ अभियानांतर्गत विविध स्तरांवर फेरबदल केले जात आहेत. पुण्यात लोकसभा निवडणुकीपासूनच शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू होत्या. अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केल्याने पक्ष नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला होता.

हा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धर्तीवर पुण्यात दोन स्वतंत्र शहराध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत शहर संघटनेची विभागणी केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी विनोद सुलतानपुरी यांच्या निरीक्षणाखाली स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्या नियुक्त्यांची घोषणा केली.

प्रशांत जगताप यांची नियुक्ती विशेष चर्चेत आहे. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांनी आपला प्रभाव कायम ठेवत अनेक नगरसेवक निवडून आणले. दीप्ती चवधरी या अनुभवी नेत्या मानल्या जातात. महापौरपद आणि विधान परिषदेतील अनुभवामुळे पश्चिम भागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT