पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'नो एंट्री'तून भरधाव आलेल्या पीएमपी बसच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाच्या कुटुंबीयांना अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दिला. धीरेन शिवप्रसाद तिवारी असात मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. ही घटना नऊ जून 2018 रोजी खाणे मारुती चौक ते पुलगेट बस थांब्यादरम्यान घडली. या एकेरी रस्त्याने तिवारी चारचाकीतून जात होते. त्या वेळी उलट्या दिशेने वेगात आलेल्या पीएमपी बसने मोटारीला धडक दिली.
या अपघातात तिवारी यांना गंभीर दुखापत होऊन उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिवारी यांच्या कुटुंबीयांनी बसचालकासह पीएमपी प्रशासन, विमा कंपनीविरुद्ध मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली. अॅड. संजय गायकवाड, अॅड. अस्लम पीरजादे, अॅड. प्रसाद शिवरकर, अॅड. सबीना शेख यांनी तिवारी कुटुंबीयांची बाजू मांडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले धीरेन तिवारी यांचे वय, त्यांचे उत्पन्न आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय या बाबी विचारात घेऊन न्यायाधिकरणाने अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
पीएमपी बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे निरीक्षण न्यायाधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी निकालपत्रात नोंदविले. अपघात घडल्यानंतर वार्षिक सात टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम मृताच्या कुटुंबीयांना परत करण्यात यावी, असे निकालात नमूद आहे.
हेही वाचा