पुणे : महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून तब्बल वीस ते पंचवीस लाखांचे साहित्य गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये जुन्या काळातील ब—ाँझचे दिवे, झुंबर, चार एसी, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, दोन एलईडी टीव्ही अशा महागड्या साहित्यांसह अनेक वस्तू गायब असल्याचे लक्षात आले. मात्र, याप्रकरणी तक्रार न दाखल करता थेट नव्याने साहित्य खरेदी करून प्रशासनाने या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम केले. (Pune News Update)
महापालिका आयुक्तांचे मॉडेल कॉलनी येथे निवासस्थान आहे. आयुक्त राजेंद्र भोसले हे मेअखेरीस सेवानिवृत्त झाले. जुलै महिन्यात त्यांनी बंगल्याचा ताबा सोडला. त्यानंतर नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम यांना या बंगल्याचा ताबा देण्यापूर्वी भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी बंगल्याची पाहणी केली. त्या वेळी बंगल्यातील महत्त्वाचे साहित्य गायब असल्याचे लक्षात आले. यामध्ये प्रामुख्याने जुन्या काळातील पितळी दिवे, झुंबर, चार एसी, 45 आणि 65 मीटरचे दोन एलईडी टीव्ही, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट, रिमोट, रिमोट बेल्स, किचन टॉप, अॅक्वागार्ड, सोफा, खुर्च्या तसेच आवारातील फुलांच्या कुंड्या या साहित्यांचा समावेश आहे. आयुक्तांचा बंगला सर्व साहित्यांनी सुसज्ज असतो. असे असताना हे साहित्य गायब झाल्याने संबंधित अधिकार्यांना धक्का बसला. मात्र, अधिकार्यांनी त्याबाबत वाच्यता न करता नवीन साहित्य खरेदी करून बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ही साहित्यखरेदी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाची पालिकेत चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्यानंतर पत्रकारांनी संबंधित अधिकार्यांना विचारणा केली असताना त्यांनी बंगल्यातील वीस ते पंचवीस लाखांचे साहित्य गहाळ झाल्याची कबुली दिली. याप्रकरणी प्रशासनाने पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे हे साहित्य नक्की कोण घेऊन गेले आणि त्याबाबत तक्रार देण्यास प्रशासन का टाळत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका आयुक्तांचा मॉडेल कॉलनीतील बंगला अर्धा एकर जागेत आहे. बंगल्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. तसेच महापालिकेचे सुरक्षारक्षकही चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात असतात, असे असताना साहित्य कसे गायब झाले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी महापौर बंगल्यातून टीव्ही चोरीला गेला होता. तेव्हा प्रशासनाने तक्रार दाखल केली होती, आता मात्र साहित्य गायब होऊन तक्रार देण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या मिळकतींचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून केले जाते, तर या बंगल्यात काही कामे करायची असल्यास अथवा खरेदी करायची असल्यास भवन विभागाकडून हे काम केले जाते. त्यामुळे या निवासस्थानातील साहित्याची यादी करणे, तसेच बंगला सोडताना किंवा नवीन अधिकारी बंगला घेताना ती तपासणे आवश्यक असते. आता मात्र साहित्य गायब झाल्यानंतर बंगल्याची जबाबदारी नक्की कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे
आयुक्त हे गेल्या आठवड्यात या बंगल्यात राहण्यास आले आहेत. मात्र, त्यांनी बंगल्यात येताना महापालिकेकडून साहित्य न घेता अनेक आवश्यक वस्तू ते स्वत:बरोबर घेऊन आले असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.