Khed Taluka: खरपुडीच्या 'सैराट' प्रकरणातील आई व भावास तीन दिवसांची पोलिस कोठडी
Summery:
प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरणाचा प्रकार घडला होता
या घटनेत पतीला पाय मोडे पर्यंत मारहाण करण्यात आली आहे
आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध
खेड : खरपुडी बुद्रुक (मांडवळा) ,ता.खेड येथे आश्रमात पतीला मारहाण आणि पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी तीन जणांना खेड पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवारी (दि ५) न्यायालयात हजर केले. तिघांनाही दि ७ ऑगस्टपर्यत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सुशीला राजाराम काशिद ( वय ५० ), अक्षय उर्फ गणेश राजाराम काशिद (वय ३० ) रा. खरपुडी बुद्रुक, योगीराज सुरेश करवंदे , वय २५ रा.पाबळ रोड राजगुरुनगर अशी कोठडी देण्यात आलेल्याची नांवे आहेत. (Pune News Update)
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, खरपुडी येथील प्राजक्ता राजाराम काशिद हि खरपुडी गावातील मांडवळा येथील आश्रमात दत्त मंदिरात पाया पडण्यासाठी जात असे. आश्रम चालक विश्वनाथ गोसावी यांची मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला.काही महिने आश्रम सोडून ते बाहेरगावी राहत होते. मुलीच्या आई,भावाकडून आंतरजातीय विवाह केला म्हणून या लग्नाला विरोध होता. प्राजक्ताला आई वडील भाऊ सांगत होते तू पुन्हा घरी ये. मात्र जाण्यास तिने नकार दिला होता.रविवारी (दि. ३) दुपारी मुलीच्या आई भावासह माहेरच्या इतर लोकांनी आश्रमातील घरी येऊन प्राजक्ताला जबरदस्ती घेऊन गेले.पती विश्वनाथ गोसावी याला मुलीचे भाऊ व बरोबर आलेल्या इतरांनी मारहाण केली. खेड पोलिसांनी अपहरण केलेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेऊन आरोपींना अटक केली आहे.
मुलीला मानसिक त्रास होतो म्हणुन आम्ही चुकीचे पाऊल उचलले. डॉक्टर, दवाखाने सोडुन फिर्यादीच्या आश्रमाचा आधार घेतला आणि अंधश्रधेपोटी आमचा घात झाला आहे. आई वडील आणि भाऊ मुलीचे अपहरण करतात का? फिर्यादी यांचे पूर्वी लग्न झाले आहे. त्यांना लग्नाच्या वयाचा मुलगी आणि मुलगा आहे. घटस्फोट नसताना दुसरे लग्न झाले. ती पत्नी अपंग स्थितीत घरात आहे. याबाबत पोलिसात माहिती दिली आहे.आमचे चुकीचे असेलही पण परिस्थितीला सामोरे जात आहोत.
राजाराम गोविंद काशिद, मुलीचे वडील

