दौंड : दौंड नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्याचा ठेका 31 जानेवारी 2025 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नगरपालिकेकडून नव्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात अपयश आल्याने शहरात कचराकोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. आता अखेर हा वाद निवळला असून, याबाबत ठेका एकाला आणि काम करणारा दुसरा असे चित्र आहे. (Pune News Update)
नगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात दोन वेळा घनकचरा व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र, दोन्ही वेळा ’तांत्रिक कारण’ दाखवत निविदा रद्द करण्यात आल्या. प्रत्यक्षात, ही प्रक्रिया एका गटातील दोन राजकीय गटांतील श्रेयवादामुळे खिळखिळी झाली होती, असे स्थानिक राजकीय वर्तुळातील बोलले जाते. या दोघांपैकी एक ठेकेदार न्यायालयात गेला होता, परंतु अखेर दुसर्या ठेकेदाराला ठेका मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे आज जे काम सुरू आहे ते एका ठेकेदाराच्या नावावर असून प्रत्यक्ष काम मात्र दुसरा ठेकेदार करत असल्याचे चित्र आहे.
ठेकेदार बदलण्याचा सारा खेळ ठरवूनच झाला होता, तर सहा महिने लोकांचा वेळ, प्रशासनाचे संसाधन आणि आरोग्याचा बळी देण्यात आला का? जिल्हाधिकार्यांनी याचा स्वत:हून चौकशी करावी, अन्यथा ’तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हीच स्थिती पुन्हा निर्माण होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
नवीन ठेकेदाराने काम सुरू केल्याची नोंद आठ दिवसांपूर्वीची असली तरी प्रत्यक्षात शहरातील स्वच्छताकामात फारसा फरक जाणवत नाही. कचर्याच्या गाड्या अनियमित असून, अपुरा कर्मचारीवर्ग आणि आरोग्य कर्मचारीही अद्याप पूर्ववत तैनात नसल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे.
मधील सहा महिन्यांत नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला. शहरात कचर्याचे ढीग साचले, आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला. डेंग्यू, मलेरिया आणि दुर्गंधीमुळे रहिवाशांचे जगणे कठीण झाले होते. या सर्व परिस्थितीवर नगरपालिकेचे प्रशासन आणि संबंधित राजकीय नेते गप्प का होते, हा सामान्य दौंडकरांचा प्रश्न आहे. जर ठेका शेवटी एका व्यक्तीलाच द्यायचा होता, तर सहा महिने निव्वळ राजकीय खेळीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याची गरज होती का? असा प्रश्न आता दौंडकर उपस्थित करीत आहेत.
ठेका संपला : 31 जानेवारी 2025
निविदा प्रक्रिया : दोन वेळा राबवली, पण रद्द
प्रमुख कारण : राजकीय श्रेयवाद, अंतर्गत धुसफूस
परिणाम : सहा महिने कचर्याचे ढीग, नागरिक वेठीस
सध्याची स्थिती : ठेका दिला, पण प्रत्यक्ष काम