पुणे

दिलासादायक : जलजन्य आजारांच्या प्रमाणात घट; आरोग्य विभागाचा दावा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अशुद्ध पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार वेगाने होतो आणि उद्रेकाची शक्यता वाढते. एखाद्या परिसरात जलजन्य आजाराचा रुग्ण सापडल्यास तातडीच्या उपाययोजना आणि उद्रेक रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये जलजन्य आजारांचे प्रमाण घटत असल्याचे दिलासादायक चित्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात दरवर्षी 70 टक्के जलजन्य आजार अशुद्ध पाण्यामुळे होतात. केंद्र सरकारच्या 'जलजीवन मिशन'च्या माध्यमातून महाराष्ट्रात घरोघरी नळजोड देण्याचे 83 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा होत असून जलजन्य आजारांचे प्रमाण घटत असल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे जोखमीच्या गावांची यादी तयार करून वर्षातून दोनदा हिरवे, पिवळे आणि लाल कार्डबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. जोखमीच्या नसलेल्या गावांना हिरव्या रंगाचे कार्ड दिले जाते. मध्यम जोखमीच्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते. जोखमीच्या ग्रामपंचायतींना लाल रंगाचे कार्ड देऊन साथरोग प्रतिबंधक कार्यवाही करण्याची सूचना देण्यात येते. त्यामुळे उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे राज्य साथरोग अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

सार्वजनिक विहिरी, कुपनलिकांच्या पाण्याची जिल्हा, राज्य आरोग्य प्रयोगशाळांकडून नियमित तपासणी केली जाते.
साथरोग नियंत्रणासाठी औषधांचा आणि इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात येतो.
रुग्णांवर आणि सहवासितांवर उपचार करण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी सुसज्जता ठेवली जाते. गावपातळीवरील जलसुरक्षारक्षकांचे पुनर्प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

कॉलराचे सर्वात कमी तर अतिसारचे सर्वाधिक रुग्ण

वर्षभरात कॉलराचे सर्वात कमी रुग्ण आढळून आले असून, ही संख्या 22 इतकी आहे. त्याखालोखाल, व्हायरल हिपॅटिटिसचे 2403 रुग्ण, गॅस्ट्रोचे 27,757, तर टायफॉईडचे 38,614 आणि अतिसारचे सर्वाधिक 3 लाख 25 हजार 927 रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये 2022 मध्ये जलजन्य आजारांमुळे सर्वाधिक 25 जणांचा मृत्यू झाला.

पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरणाबाबत सूचना दिल्या आहेत. आयएचपी पोर्टलद्वारे प्रत्येक आरोग्य केंद्राचे मॉनिटरिंग होत आहे.

– डॉ. दीपक साळुंखे, राज्य साथरोग अधिकारी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT