सीओईपी मुलींच्या वसतिगृहातील अस्वच्छतेवर मनविसेचा संताप Pudhari
पुणे

COEP Girls Hostel Protest: सीओईपी मुलींच्या वसतिगृहातील अस्वच्छतेवर मनविसेचा संताप

‘झुरळांचे ताट’ ठेवत विद्यार्थ्यांचा निषेध; 72 तासांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात अस्वच्छता, पाण्याचा तुटवडा आणि मूलभूत सुविधांचा अभाव या गंभीर समस्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वसतिगृह रेक्टरसमोर प्रतिकात्मक ‌‘झुरळांचे ताट‌’ सादर करून निषेध नोंदवला. तसेच सुधारणा न केल्यास तीव आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला.(Latest Pune News)

मुलींच्या मेसमध्ये जेवणात झुरळे, माशा आणि अगदी स्टेपलरच्या पिना सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघड झाला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी वसतिगृह रेक्टरसमोर आंदोलन केले. विद्यार्थिनींकडून वारंवार तक्रारी केल्या जात असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनविसेकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संघटनेने सीओईपी प्रशासनाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला असून, या कालावधीत सर्व समस्या दूर न झाल्यास दररोज नवी आंदोलने करण्यात येतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी सांगितले की, “मुलींच्या वसतिगृहात मेस व स्वयंपाकघरात अस्वच्छता, झुरळे, दुर्गंधी आणि निष्काळजीपणा ठळकपणे दिसतो. अनेक विद्यार्थिनींनी आरोग्याशी संबंधित तक्रारी दिल्या तरी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.” पाण्याचा तुटवडा, अस्वच्छ बाथरूम, तुटलेल्या दारं-खिडक्या, वारंवार बंद पडणारी लिफ्ट, वायफाय व नेटवर्कचा अभाव अशा समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. 24 तास पाणी, वीज व वायफाय सुविधा देण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात तशी व्यवस्था नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

या आंदोलनाचे नेतृत्व धनंजय दळवी आणि केतन डोंगरे यांनी केले. या वेळी सचिन पवार, रूपेश घोलप, अभिषेक थिटे, विक्रांत भिलारे, आशुतोष माने, संतोष वरे, अशोक पवार, नीलेश जोरी, हेमंत बोळगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

‌‘मनविसे‌’च्या प्रमुख मागण्या

वसतिगृहातील मेसची तत्काळ स्वच्छता व देखभाल करावी.

24 बाय 7 पाणी व वीजपुरवठा सुनिश्चित करावा.

कायमस्वरूपी वसतिगृह व्यवस्थापकाची नेमणूक करावी.

विद्यार्थिनींसाठी 24 तास तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी.

निष्काळजी अधिकारी, मेस व्यवस्थापक व वॉर्डन यांच्यावर कठोर कारवाई करावी.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील समस्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT