पुणे: मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. रुग्णालयांची बेडची क्षमता, मनुष्यबळ, आवश्यक कागदपत्रे यांच्या तपासणीसाठी विशेष पथक स्थापन केले आहे. यामध्ये बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे. शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे अध्यक्ष आणि सदस्य निवडण्याची जबाबदारी दिली आहे.
कक्षाकडून 20 प्रकारच्या गंभीर आजारांसाठी संलग्नीकृत रुग्णालयांमार्फत रुग्णांना अर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी नवीन रुग्णालय संलग्नीकरण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश असलेले तपासणी पथक गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Pune News)
तपासणी पथकामध्ये बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक अध्यक्षस्थानी असून, सदस्यपदी एक सहयोगी प्राध्यापक, एक सहायक प्राध्यापक सदस्य म्हणून आणि जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे समाजसेवा अधीक्षक प्रतिनिधी यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश केला आहे.
तपासणी पथकाने पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 14 रुग्णालयांच्या पाहणीला सुरुवात केली आहे. पथकामध्ये अध्यक्ष म्हणून औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अनिता बसवराज, सदस्य म्हणून शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष चव्हाण, स्त्रीरोगशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर जाधव आणि सदस्य सचिव म्हणून समाजसेवा अधीक्षक समर्थ सुरवसे यांचा समावेश केला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी नवीन रुग्णालय संलग्नीकरण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश असलेले तपासणी पथक गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पथकाकडून रुग्णालयांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय