पुणे : भविष्यात क्लाउड फिजिक्स अर्थात ढगांवर विशेष संशोधन करण्यासाठी पुण्यात सेंटर ऑफ एक्सलन्स उभे केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज पुण्यात दिली. शहरात त्यांच्या उपस्थितीत 11 व्या जागतिक हवामान परिषदेचे उद्घाटन झाले. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.(Latest Pune News)
डॉ. रविचंद्रन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम अभियान हाती घेतले असून, 2047 पर्यंत क्लायमेट स्मार्ट नेशन बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे गरजेचे आहे. सॅटेलाइट उभे करणे, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतात विकसित करणे, यासाठी केंद्रीय मंत्रालय प्रयत्नशील आहे.
भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) वतीने रविवारपासून 11 व्या जागतिक हवामान परिषदेस प्रारंभ झाला. जागतिक हवामान संस्थेच्या सहकार्याने हवामान बदलाविषयी शास्त्रज्ञांच्या परिषदेचे आयोजन 3 ते 7 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला मंडोस, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पुढील पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी होणार असून, हवामानबदलाचा अभ्यास, संशोधन, विकसित तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्रात संशोधनपर निबंध सादर होणार आहेत.
संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) पर्जन्यवृद्धी विज्ञान प्रकल्प यंदा दशकपूर्ती साजरी करीत आहे. यात 76 देश आणि 3,700 हून अधिक संबंधित संस्था सहभागी झाल्या. 14 संशोधकांना 25 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे अनुदान देण्यात आले. या प्रकल्पात 1,800 संशोधकांनी सहभागी होऊन 105 वैज्ञानिक प्रकाशने आणि 10 एकस्व अधिकार निर्माण केले. येत्या तीन वर्षांत 1.5 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे अनुदान देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. अब्दुल्ला यांनी केले.
मिशन मौसम या योजनेअंतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लाउड फिजिक्स’ची उभारणी पुण्यातील आयआयटीएम संस्थेत करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडणे, गारपीट नियंत्रणे, धुके, वायुप्रदूषण कमी करणे, अशा विषयांवर अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच क्लाउड चेंबर विकसित करून मूलभूत संशोधनाला चालना दिली जाणार आहे.