New Textbooks Pudhari
पुणे

Class 3 4 6 New Textbooks: तिसरी, चौथी, सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे विषय अनिवार्य; शारीरिक शिक्षण, कला, कार्यशिक्षणाची पुस्तके वापरावी लागणार

एनईपी २०२०नुसार अभ्यासक्रमात बदल; आठवड्याच्या तासिकाही निश्चित, सर्व माध्यमांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शालेय अभ्यासक्रमात केलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांची नव्याने प्रकाशित केलेली पाठ्यपुस्तके आता अनिवार्यपणे वापरावी लागणार आहेत.

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये या पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याच्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर तसेच प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिले. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

त्याअंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित केली आहेत. त्यापैकी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण आणि कलाशिक्षण, तर सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण आणि कलाशिक्षण या विषयांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये आवश्यक कार्यवाही करून या पाठ्यपुस्तकांचा वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व माध्यमांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध

मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) विभागीय भांडारांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी या अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा नियमित वापर करावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली माध्यमांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके ‘ई-बालभारती’च्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

आठवड्याचे तासही निश्चित

शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांसाठी आठवडानिहाय तासिका आणि वेळापत्रक यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयांचे केवळ पुस्तक उपलब्ध करून देणे नव्हे, तर नियोजित वेळापत्रकानुसार अध्यापन करणे अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT