पुणे : महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्या नियुक्तीची फाईल गहाळ झाल्याचा दावा सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येत आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्तांनी मात्र ही फाईल उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर जगतापांच्या नियुक्तीची चौकशी टाळण्याचा प्रयत्न तर केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेले जगताप यांनी अनेक वर्षे विविध विभागांत केले आहे. घनकचरा विभाग, अतिक्रमण निर्मूलन, आपत्ती व्यवस्थापन आणि मिळकत कर विभाग या विभागांचे खातेप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यात अतिक्रमण विभागात त्यांनी औंधमधील परिहार चौकातील बेकायदा गाळेधारकांना परस्पर परवान्यांचे वाटप केल्याने ते अडचणीत आले होते. तसेच मिळकत कर विभागात असताना अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकाराचे उल्लंघन करत परस्पर करांमध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणात त्यांच्या खातेनिहाय चौकशीत सत्यता आढळून आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दोन वेतनवाढ रोखण्याची तात्पुरती कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, त्यानंतर प्रशासनाने जगताप यांच्या नियुक्तीपासून घेतलेल्या निर्णयांची तपासणी सुरू केली आहे. यासाठी त्यांच्या नियुक्तीची फाईल मागविण्यात आली. मात्र, गेल्या 3 महिन्यांपासून ही फाईल अद्याप सापडत नव्हती. या फाईलसाठी प्रशासन विभागाने सर्व विभागांचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना पत्र लिहून ही फाईल आहे का हे तपासण्याचे कळविले होते. मात्र, त्यानंतरही फाईल सापडली नाही. दरम्यान, यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांना मात्र उपायुक्त जगताप यांच्या नियुक्तीची आणि सेवा पुस्तकाची झेरॉक्स प्रत सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
तर, समान्य प्रशासन विभागाचे उपायुक्तांकडून जगताप यांच्या नियुक्तीची फाईल अद्याप सापडली नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जगतापांच्या नियुक्ती प्रकियेच्या चौकशीत समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.