निनाद देशमुख
पुणे: पुण्यातील बहुप्रतीक्षित आणि सर्वांत लांब अशी ओळख असणार्या सिंहगड पुलाची एक बाजू ही 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या पुलामुळे या मार्गावरील प्रवास अर्ध्या तासावरून काही मिनिटांवर आला असला, तरी अद्याप या मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झालेली नाही.
एक बाजू सुरू झाली तरी दुसरी बाजू कधी सुरू होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत असून, या मार्गावरील कोंडीतून सुटका होण्यासाठी नागरिकांना आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. (Latest Pune News)
सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाची एक बाजू खुली करण्यात आल्याने वडगावच्या दिशेने जाणार्या वाहनचालकांची कोंडीतून सुटका झाली आहे.
या पुलाचे काम 21 सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले होते. अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी दुसर्या बाजूच्या पुलाचे काम अद्याप सुरूच आहे.
पुलाची एक बाजू सुरू झाल्यावर या मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी पुणेकरांची अपेक्षा होती. मात्र, पूल सुरू झाल्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुलावर कोंडी होत असल्याने अनेक जण पुलाच्या विरोधी दिशेने माघारी फिरत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या मार्गावरील कोंडीतून कधी सुटका होणार? हा प्रश्न कायम होता.
पुलाची एक बाजू पूर्ण झाल्याने पुलाची दुसरी बाजू कधी सुरू होणार? याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. पुलाच्या दुसर्या बाजूचे काम पालिकेमार्फत वेगाने सुरू करण्यात आले आहे. येथील रॅम्पचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.
लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. पालिकेच्या भवन विभागाने येत्या दोन महिन्यांत पुलाच्या दुसर्या बाजूचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही कामे करताना पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम देखील हाती घेतले जाणार आहे. हळूहळू हे काम पूर्ण केले जाणार आहे.
दुसर्या बाजूच्या पुलाची देखील होणार ‘लोड टेस्ट’
सिंहगड पूल वाहतुकीसाठी खुला करण्याआधी पालिकेने पूर्ण खबरदारी घेतली होती. या पुलाची लोड टेस्ट करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. यासाठी चार ते पाच पूर्णक्षमतेने भरलेले हायवा ट्रक एकाच ठिकाणी 24 तास उभे ठेवण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू 36 तासांनी हे ट्रक काढून घेण्यात आले.
यानंतर डिप्लेक्शन मीटरच्या साह्याने या पूल किती वाकला व किती वेळात पूर्वस्थितीत आला, हे पाहण्यात आले होते. दुसर्या बाजूची देखील लोड टेस्ट केली जाणार आहे. पुलाची कामे पूर्ण झाल्यावर ही लोड टेस्ट केली जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
वडगाव पुलाखालील पोलिस चौकीसह अतिक्रमण काढले
या मार्गावरील वाहतूक वेगवान करण्यासाठी पालिकेच्या भवन विभागामार्फत वेगाने काम सुरू आहे. वडगाव पुलाखाली असणारी पोलिस चौकी व तेथील अतिक्रमणामुळे तब्बल दोन लेन अडकून पडल्या होत्या. या लेनवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे येथील दोन लेन आता वाहतुकीसाठी वापरता येणार असून, वेगाने नव्याने तयार होणार्या पुलापर्यंत पोहचून पुढील पाच मिनिटांत नागरिकांना राजाराम पुलापर्यंत पोहचता येणार आहे.
वडगाव पूल ते धायरी फाटा यादरम्यानची अतिक्रमणे काढणार
वडगाव पूल ते धायरी फाटादरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण काढून हा मार्ग नो-पार्किंग झोनमधून घोषित केला जाणार आहे. याबाबतचे पत्र पालिकेच्या अधिकार्यांनी पोलिसांना दिले आहे.