

पुणे: अवकाळी पावसामुळे जागोजागी पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
राज्यात पालघरपाठोपाठ पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पालघरमध्ये यावर्षी डेंग्यूचे 116, तर पुणे जिल्ह्यात 99 रुग्ण आढळून आले आहेत. (Latest Pune News)
अचानक पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी व दमट हवामान डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. बैठकीत डासनिर्मूलन मोहिमेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व सार्वजनिक ठिकाणी फवारणी, साचलेले पाणी काढून टाकणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये, वसाहती या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
ताप, अंगदुखी, डोकेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे असून, त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच, घरामध्ये आणि घराबाहेर पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि स्वच्छता राखणे हे प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
डेंग्यू कशामुळे?
डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. डेंग्यूचा प्रसार एडिस एजिप्ती प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला डेंग्यू विषाणूदूषित डास चावल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू तापाचे 3 प्रकार आहेत. डेंग्यू हा फ्लूसारखा आजार आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, आशा यांच्यामार्फत ताप रुग्ण
सर्वेक्षण केले जाते.
डेंग्यू तापाच्या निष्कर्षासाठी रुग्णांचे रक्तनमुने घेऊन संशयित रुग्णांना पूर्ण उपचार दिले जातात.
तपासणीअंती आढळून येणार्या रुग्णांना समूळ व पूर्ण उपचार दिले जातात.
उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.
घरातील व परिसरातील डास अळ्या आढळून आलेल्या पाण्याच्या साठ्यांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. पाणीसाठ्यात गप्पीमासे सोडले जातात.
एनआयव्ही पुणे/राज्यातील निवडक 50 सेंटिनल सेंटर येथे विषाणू परीक्षणासाठी पाठविले जातात. एडिस एजिप्ताय डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी एनआयव्ही तपासणीसाठी पाठविले जातात.