पुणे: पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने गुरुवारपासून महावितरण आणि एमएनजीएलला नवीन खोदाईसाठी बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक आणि तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठीच खोदाई करता येणार आहे. अनधिकृतपणे खोदाई केल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Latest Pune News)
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. शहरात खासगी कंपन्या, महावितरण, एमएनजीएल तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागास खोदाईसाठी पथ विभागाकडून परवानगी दिली जाते.
या परवानग्या 31 मेपर्यंत दिल्या जातात. मात्र, या वर्षी रस्ते दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त करण्यासाठी महावितरण आणि एमएनजीएल यांना पहिल्यांदाच 15 मेपर्यंत खोदाईसाठी परवानगी देण्यात आली होती.
या दोन्ही विभागानी सेवावाहिन्या टाकण्यात आल्यानंतर त्यांनी खोदाई केलेल्या ठिकाणी महापालिकेकडून रस्ते दुरुस्ती केली जाते. त्यामुळे, महापालिकेने 15 दिवस आधीच या दोन्ही विभागांच्या खोदाईस मनाई केली असून, पुढील 15 दिवसांत हे रस्ते महापालिकेकडून दुरुस्त केले जाणार आहेत. यासंबधीची नोटीस पथ विभागाकडून देण्यात आली आहे.
पोलिसांना 31 मेपर्यंत मुभा
पोलिसांकडून शहरात 1200 ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. या कामासाठी महापालिकेकडून केबल टाकण्यासाठी संबंधित ठेकेदारास परवानगी दिली आहे. ही मुदत 31 मेपर्यंत असणार आहे.
या शिवाय, महापालिकेच्या समान पाणी योजनेचे काम, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी ओएफसी केबल टाकण्याचे कामही सुरू असून या तीन्ही विभागांना 31 मे ही अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर या विभागांनाही शहरात खोदाईस मनाई असणार असून 1 ऑक्टोबरनंतरच खोदाईस परवानगी दिली जाणार आहे.