पुणे

भामा आसखेडमधून आवर्तन सुरूच; कमी पाणीसाठ्यामुळे खेडमधील शेतकर्‍यांचा आक्रोश

Laxman Dhenge

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : भामा आसखेड धरणातून 21 मार्चपासून 1 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आधीच धरणात 29.17 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी हा साठा 54. 36 टक्के होता. धरणातून पाणी सोडले जात असल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्र उघडे पडत चालले आहे. त्याचा परिणाम खेड तालुक्यातील शेतीवर होत आहे. सध्याचा कडक उन्हाळा पाहता पुढील दोन महिने पाणी कसे पुरेल याचे नियोजन जलसंपदा विभागाने करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
धरणातून पाणी सोडताना धरणावर अवलंबून असलेल्या खेड तालुक्यातील शेतक-यांचादेखील विचार करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान धरणाचे जलाशय क्षेत्र कोरडेठाक पडत चालल्याने शेतकर्‍यांचा आक्रोश वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे याबाबत कोणताच राजकीय पक्षाचा पदाधिकारी बोलायला तयार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
21 मार्चपासून धरणातून 1 हजार क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. गेली 25 दिवस आवर्तन सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी कमी होत चालले आहे. पाणी जसे कमी होईल तसे शेतकरी कृषीपंप उचलून पुढील पाण्यात नेत आहेत. यात शेतक-यांची दमछाक होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना नवीन केबल विकत घ्यावी लागत आहे. जर धरणातून पाणी प्रमाणापेक्षा जास्त सोडले नसते तर हा भुर्दंड शेतकर्‍यांना बसला नसता. आणखी किती दिवस पाणी धरणातून पाणी सोडले जाणार? आमच्यासाठी पाणी शिल्लक राहणार की नाही हा प्रश्न खेडमधील शेतकर्‍यांना भेडसावत आहे. भामा आसखेड धरणतील पाणी नियोजनानुसार दौंड तालुक्यातील आलेगावपागा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरल्यानंतर पाणी सोडणे बंद होते. परंतु, हा बंधारा भरून पुढे पाणी चालल्याने धरणातील साठा आणखी कामी होण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

मागील वर्षी धरणात आजच्या तारखेस 54.36 टक्के पाणीसाठा होता. पाणी पातळी 664.03 दलघमी होती. एकूण पाणीसाठा 131.543 दलघमी तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 118.02 दलघमी होता. सध्या धरणात 29.17 टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी 658.23 दलघमी आहे. एकूण पाणीसाठा 76.862 दलघमी तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 63.34 दलघमी आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT