Christmas celebration Pune Pudhari
पुणे

Christmas celebration Pune: ख्रिसमसच्या जल्लोषाने उजळला महात्मा गांधी रस्ता; कुटुंबीयांसह चिमुकल्यांची गर्दी

रंगीबेरंगी रोषणाई, सांताक्लॉज आणि सेल्फीचा उत्साह; कॅम्पसह शहरात ख्रिसमस सण आनंदात साजरा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : रंगीबेरंगी फुगे... आकर्षक विद्युत रोषणाई... तरुणाईची रेलचेल... सांताक्लॉजसोबत लहानग्यांचा किलबिलाट... शुभेच्छांचे वर्षाव... आणि सेल्फीची क्रेझ, अशा जल्लोषपूर्ण वातावरणाने ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी रस्ता जल्लोष करण्यात आला, यावेळी असंख्य नागरिकांच्या गर्दीने हा रस्ता गजबाजल्याचे पाहायला मिळाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांनी पुण्यातील प्रसिद्ध महात्मा गांधी रस्त्यावर एकत्र येत नाताळ सणानिमित्त जल्लोष केला. अनेकांनी सांताक्लॉजच्या टोप्या डोक्यात घालून, लाल रंगाचे फुगे आकाशात सोडून, जिंगल बेल जिंगल बेल, असे गाणे म्हणत नाताळ सणानिमित्त आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी एकमेकांना शुभेच्छा देत तरुणाईने ख्रिसमस सणाचा आनंद लुटला. दरम्यान, यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महात्मा गांधी रस्त्यावर सज्ज होते.

गुरुवारी ख्रिस्तबांधवांनी नाताळसणाचे जल्लोषात स्वागत केले. ‌‘मेरी ख्रिसमस‌’ म्हणत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कॅम्प परिसरात ख्रिस्तबांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे चर्चचे प्रमाणही जास्त आहे. कॅम्प परिसरात असणाऱ्या अनेक चर्चमध्ये नाताळसणानिमित्त प्रार्थना करण्यात आली. ख्रिस्तबांधवांच्या आदराचे प्रतीक असलेल्या नाताळसणाने शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. या उत्साहपूर्ण वातावरणात तरुणाई सायंकाळच्या सुमारास एम. जी. रोडवर उतरली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

शहरात ख्रिसमस उत्साहात

थंड हवेची चाहूल, रोषणाईने उजळलेले रस्ते, चर्चमधील प्रार्थनांचा गजर आणि कॅम्प, जंगली महाराज रस्ता येथे तरुणाईचा जल्लोष अशा वातावरणात पुण्यात ख्रिसमसचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कॅम्प, फातिमानगर, वानवडी, कोरेगाव पार्क, औंध-बाणेर परिसरात ख्रिसमसची धामधूम पाहायला मिळाली.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीपासूनच चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि ‌‘मिडनाईट मास‌’ला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सेंट पॅट्रिक कॅथेड्रल, सेंट मेरी चर्च, होली फॅमिली चर्च यांसह शहरातील विविध चर्चमध्ये श्रद्धा, शांती आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या प्रार्थनांनी वातावरण भारावून गेले होते. येशू ख्रिस्तांच्या जन्मकथेचे सादरीकरण, कॅरोल्स भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

कॅम्प परिसरात ख्रिसमसच्या निमित्ताने तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. फर्ग्युसन रोडपासून एम.जी. रोड, ईस्ट स्ट्रीटपर्यंत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. सांताक्लॉजच्या टोप्या, लाल-पांढऱ्या पोशाखात सजलेले तरुण-तरुणी, हातात सेल्फी स्टिक्स आणि मोबाईल कॅमेरे-असा जल्लोषाचा माहोल दिसून आला. कॅफे, रेस्टॉरंट्‌‍स आणि बेकरीबाहेर विशेष गर्दी होती. कॅरोल्स, लाईव्ह म्युझिक आणि मित्र-मैत्रिणींसोबत साजरा होणारा ख्रिसमस तरुणाईसाठी खास आकर्षण ठरला. अनेक कुटुंबांनी घरात ख्रिसमस ट्री सजवून एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT