लहान मुलांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखा Pudhari
पुणे

Child Pneumonia Awareness Maharashtra: लहान मुलांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखा

डॉक्टरांचे आवाहन : राज्यभरात ‌’न्यूमोनिया दिना‌’निमित्त जनजागृती मोहीम

पुढारी वृत्तसेवा

पुणे : न्यूमोनिया हा मुलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य पण गंभीर फुफ्फुसांच्या संसर्गांपैकी एक आहे. योग्य वेळी उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. लक्षणे वेळीच ओळखल्याने पालकांना वेळेवर वैद्यकीय मदत घेण्यास आणि गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून उपचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.(Latest Pune News)

न्यूमोनिया मुख्यत्वेकरून जीवाणू, विषाणू किंवा बुरशीजन्य संक्रमणामुळे होतो. पाच वर्षांखालील मुलांमध्ये लसीकरण अपुरे असणे, कुपोषण, वायूप्रदूषण आणि दुर्बल प्रतिकारशक्ती या कारणांमुळे संसर्गाचा धोका वाढतो. श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, ताप, छातीत दुखणे, अन्न न घेणे, जलद श्वासोच्छ्वास ही प्राथमिक लक्षणे आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षभरात महाराष्ट्रात बालन्यूमोनियाचे सुमारे 1.8 लाख प्रकरणे नोंदवली गेली. ग््राामीण भागात अजूनही या आजाराचे निदान उशिरा होत असल्याने गंभीर गुंतागुंती निर्माण होतात. बालकांमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी न्यूमोनियाविरुद्ध शून्य सहनशीलता हे उद्दिष्ट ठेवून राज्य सरकारने बालआरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष तपासणी शिबिरे सुरू केली आहेत.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

सतत खोकला येणे

ताप आणि थंडी वाजून येणे

अशक्तपणा आणि थकवा येणे

ओठ किंवा बोटे निळसर पडणे

भूक न लागणे किंवा उलट्या होणे

न्यूमोनियाचा घातक संसर्ग फुफ्फुसांवर परिणाम करतो, ज्यामुळे फुफ्फुसांना सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. प्रौढांपेक्षा मुलांवर न्यूमोनिया संसर्गाचा अधिक परिणाम होतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप विकसित झालेली नसते. हा आजार सौम्य ते गंभीर प्रमाणात आढळून येऊ शकतो. विशेषतः 5 वर्षाखालील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. वेळीच निदान आणि त्वरित उपचार जलद बरे होण्यास मदत करतात. वेळीच उपचारांकरिता लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
डॉ. मौनीश बालाजी, बालरोग फुफ्फुसविकारतज्ज्ञ
न्यूमोनियाचे प्रारंभिक निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वेळा पालक ताप आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग वाढतो. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे पालन, घरातील स्वच्छता, पोषक आहार आणि प्रदूषणापासून संरक्षण हीच न्यूमोनियावरची खरी ढाल आहे. वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि पालकांची जागरूकता यामुळेच मुलांचे जीव वाचू शकतात.
डॉ. सीमा देशमुख, बालरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT