Child neglect due to loss of sensation 
पुणे

संवेदना हरवल्याने बालकांची हेळसांड

backup backup

पिंपरी : संतोष शिंदे : एक निष्ठुर पिता आपल्या लहान मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर, काहींनी नराधम बापाला शोधून त्याला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत संताप व्यक्त केला.

मात्र, या व्हिडीओमुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तसेच अलीकडे मुलांचा लैंगिक छळ केल्याच्या घटना देखील प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी 'पुढारी'ने जाणकारांशी चर्चा करून केलेला हा विशेष वृत्तांत.

पालकांची सजगता महत्त्वाची

पिंपरी- चिंचवड शहरात पालकांनी मुलांचा अमानवी शारीरिक छळ झाल्याच्या घटना तुलनेत कमी असल्या तरीही इतरांकडून लैंगिक छळ झाल्याचे प्रकार वरचेवर वाढले आहेत.

चालू वर्षात तब्ब्ल 151 ठिकाणी बालकांवर अत्याचार झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी आळंदी येथे मृदंग शिकण्यासाठी जाणार्‍या 11 वर्षाच्या मुलावर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केले.

मुलाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर संबंधित शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच, भोसरी येथे यू-ट्यूबवर पाहून 12 वर्षीय भावाने आपल्या तीन वर्षाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.

याव्यतिरिक्त सोसायटीतील सुरक्षा रक्षक, शिक्षक, नातेवाईकांनी देखील मुलांचा लैंगिक छळ केल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. त्यामुळे पालकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

जाणून घ्या मुलांचे अधिकार

घरातील लहान मुलांना जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा आणि संरक्षणाचा असे चार अधिकार आहेत. यातील संरक्षणाच्या अधिकारात अत्याचार, हिंसा, दादागिरी, बालमजुरी, व्यसनापासून सुरक्षित राहण्याचे अधिकार आहेत.

तसेच, हिंसा, लैंगिक छळ यापासूनही सुरक्षित ठेवण्याचा अधिकार बालकांना कायद्यात प्रदान करण्यात आला आहे. जगण्याचा अधिकारात जन्म घेण्यापासून योग्य आहार, आरोग्याच्या सुविधा मिळवण्याचे अधिकार बालकांना आहेत.

विकासाच्या अधिकारात बालकांना शिक्षणाचा व खेळण्याचे अधिकार आहेत. याव्यतिरिक्त सहभागाच्या अधिकारात मत मांडण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

गुड, बॅड टच शिकवा

लहान मुलांना गुड आणि बॅड टचमधील फरक पालकांनी समजून सांगण्याची गरज आहे. काळजीपोटी, पालनपोषण करताना किंवा मदत करताना झालेले स्पर्श वगळता इतर स्पर्श हे जबरदस्ती, अत्याचारी आणि भयानक असतात हे मुलांना पटवून द्या.

ज्यामुळे मुले वेळीच सावध होऊन गुन्हा रोखला जाऊ शकतो.

मुलांना सांगा, कोण आहेत पोलिस

आपल्याकडे लहान मुलांना पोलिसांची भीती घातली जाते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या मनात पोलिसांबाबत नकारात्मक भावना तयार होते. मुलांना समाजव्यवस्था समजून सांगणे आवश्यक आहे.

पोलिस हे कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. पोलिस मुलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत. पोलिस मुलांचे मित्र व मार्गदर्शक आहेत.

गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आरोपीला शिक्षा देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणे, ही पोलिसांची प्राथमिक कर्तव्ये आहेत.

जेव्हा मुलांशी गैरवर्तन, लैंगिक छळ किंवा मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होते, अशा वेळी पोलिस कारवाई करतात. या बाबी मुलांना पटवून देणे गरजेचे आहे.

बालविवाह थांबवा

आजही काही समाजामध्ये अनिष्ठ रूढी परंपरा पाळल्या जातात. शहरातही बालविवाह सारख्या घटना घडतात. यातूनही बालकांचे शोषण होते.

भारतात कायदेशीर लग्नाचे वय मुलींसाठी 18 व मुलांसाठी 21 वर्ष आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांची शिक्षा व एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

बालविवाह रोखण्यासाठी पोलीस मदत करतात..कमी वयात गर्भधारणा झाल्याने मुलीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

मुलांच्या सुरक्षिततेसाठीचे महत्त्वाचे कायदे

बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायदा 2015, बाल मजूर (प्रतिबंध व नियमन) कायदा 2016, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण, कायदा 2012, शिक्षणाचा हक्क, कायदा 2009, बालविवाह प्रतिबंध, कायदा 2006 हे मुलांच्या सुरक्षितेसाठी महत्वाचे कायदे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT