Balbharati History Book Pudhari
पुणे

Balbharati History Book: शिवरायांच्या कार्याचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजणार

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, धैर्य, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेम यांसारख्या मूल्यांचा विकास करण्याकडे बालभारतीचा कल

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील तेजस्वी, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले महान शासक होते. त्यांनी स्वराज्याची संकल्पना साकार करून जनतेच्या मनात स्वाभिमान जागवला. त्यांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि लोकाभिमुख धोरणांमुळे मराठा साम्राज्याची भक्कम पायाभरणी झाली.

त्यांचे जीवन आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा जाज्वल्य इतिहास इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिकवून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, धैर्य, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेम यांसारख्या मूल्यांचा विकास करण्याकडे बालभारतीचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना यंदा देण्यात आली आहे.

इयत्ता चौथीच्या “आपल्या सभोवतालचे जग - भाग २” या बालभारतीच्या पुस्तकात इतिहासाची प्राथमिक ओळख करून देताना विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाचा उद्देश मुलांना इतिहासातील घटना, व्यक्तिमत्त्वे आणि स्वराज्याची निर्मिती यांची सोपी आणि प्रेरणादायी ओळख करून देणे हा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म, बालपण आणि त्यांच्यावर झालेले संस्कार, जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान, स्वराज्य स्थापनेची सुरुवात आणि सुरुवातीच्या मोहिमा, किल्ल्यांचे जिंकणे, प्रशासन आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्था, शौर्य, धाडस, न्यायप्रियता आणि लोकांबद्दलची काळजी या गुणांचे उदाहरण, राज्याभिषेकाचे महत्त्व आणि त्यातून निर्माण झालेली स्वाभिमानाची भावना, शिवकालीन समाजजीवन, संरक्षणव्यवस्था आणि शासनपद्धती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.

'शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र' या प्रकरणाने पुस्तकाची सुरुवात झाली आहे. या पाठाच्या माध्यमातून त्या काळात असलेला निजामशाही, आदिलशाही आणि मोगल सत्ता यांचा प्रभाव आणि सामान्य जनतेची स्थिती कशी होती. त्यातून स्वराज्याची गरज का निर्माण झाली याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

तसेच 'संतांचे कार्य' या पाठाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे. मराठा सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठाच्या माध्यमातून शूर मराठा सरदार, वेरूळचे भोसले आणि शहाजीराजे यांचे कार्य विद्यार्थ्यांना समजणार आहे. प्रतापगडावरील पराक्रम यामध्ये अफजलखानाचा वध, शर्थीने खिंड लढवली.

यामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत गाजवलेले शौर्य, शाहिस्तेखानाची फजिती यामध्ये शिवरायांनी लाल महालात केलेला पराक्रम आदी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 'पुरंदरचा तह' आणि 'वेढा' या पाठात शिवाजी महाराजांना करावा लागलेला तह, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या या पाठातून त्यांची आग्रा येथून झालेली सुटका, एक अपूर्व सोहळा या पाठातून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, दक्षिणेतील मोहीम या पाठात कर्नाटकमधील स्वराज्याचा विस्तार याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

गडकोटांचे आणि आरमारचे व्यवस्थापन, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे या पुस्तकातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कार्याची ओळख होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवरायांबद्दलची नवीन माहिती विद्यार्थ्यांना व्हावी

गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची तीच तीच माहिती देण्यात येत आहे. परंतु इतिहास हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची नवीन काही माहिती मिळाली असेल तर ती या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे गरजेचे आहे. जेणेरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी चांगली भर पडेल, असे मत पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT