पुणे

औरंगजेबाचे उदात्तीकरण चुकीचे : छत्रपती संभाजीराजे; खालच्या थराचे राजकारण थांबवा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य स्थापन करताना औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. अशा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. जर अभिवादनच करायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करावे, असे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या प्रांगणातील शाहू महाराजांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून छत्रपती संभाजीराजे यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी स्वराज्यचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, एसएसपीएमएस संस्थेचे सचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, भगवान साळुंखे, साहेबराव जाधव, सचिन कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना बाजूला ठेवून कोणताही पक्ष राजकारण करू शकत नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहून सर्वांनी काम करावे. राजर्षी शाहू महाराजांनी समता, बंधुता, शिक्षणक्षेत्रात बहुजनांचे कल्याणकारी राज्य साकारले. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असल्याने खालच्या थराचे राजकारण करण्याचे सर्व पक्षांनी थांबवावे आणि शाहू महाराजांच्या विचारांचे आत्मचिंतन करावे.

ज्या पध्दतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शाहू महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणावर सुरू करावी. त्याचबरोबर रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे, तसेच राज्यातील 50 किल्ले रायगड प्राधिकरणाकडे दत्तक म्हणून द्यावेत, अशी मागणीही छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT