सर्व्हर डाऊनमुळे तंत्रशिक्षण डिप्लोमाचे विद्यार्थी हवालदिल; कागदपत्रेच मिळेनात | पुढारी

सर्व्हर डाऊनमुळे तंत्रशिक्षण डिप्लोमाचे विद्यार्थी हवालदिल; कागदपत्रेच मिळेनात

गणेश खळदकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावीनंतर विद्यार्थ्यांना आता अकरावी, तंत्रशिक्षण, आयटीआय प्रवेशाचे वेध लागले आहेत. परंतु, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे शासकीय दिरंगाई आणि सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. त्यातच आता तंत्रशिक्षण प्रवेशासाठी अर्ज करण्यास केवळ एक सुटी वगळता तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस. एस. सी. पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एच. एस. सी. औषधनिर्माणशास्त्र, एच. एम. सी. टी., सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम यांसह पदवी आणि पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करताना संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीत नमूद प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकार्‍यांकडून घेऊन अपलोड करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण डिप्लोमासाठी 1 ते 30 जून कालावधी अर्ज करण्यासाठी देण्यात आला आहे. परंतु, अनेक विद्यार्थी प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. एकीकडे तंत्रशिक्षणाच्या अधिकार्‍यांचे नसलेले सहकार्य आणि दुसरीकडे शासनाची दिरंगाई, या कचाट्यात विद्यार्थी सापडले असून, अनेक विद्यार्थी प्रवेशाला मुकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तंत्रशिक्षण प्रवेशासाठी अर्ज करण्यास तसेच कागदपत्रे अपलोड करून अर्जाची निश्चिती करण्यासाठी 30 जूनची मुदत देण्यात आली आहे. परंतु, सध्या सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही कागदपत्रे मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी अर्ज करण्यास मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी आणि काही कागदपत्रे अपलोड करण्याऐवजी हमीपत्र किंवा कागदपत्रांची रिसीट घेऊन प्रवेशाची संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

अधिकार्‍यांचे हात वर…

कागदपत्रे अपलोड करण्यातील अडचणीबाबत पुणे विभागा तील अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळत नसल्यासंदर्भात जिल्हा नोडल अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणींविषयी संचालकांना कळविणार असल्याचे स्पष्ट करीत हात वर केले.

तंत्रशिक्षण प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

जात प्रमाणपत्र
जातवैधता प्रमाणपत्र
नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
डोमिसाईल प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अपंगत्वाचे प्रमाणपत्र
आधार क्रमांक,बँक खाते

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक दाखले देण्यात येत आहेत. सोमवारी सर्व्हर डाऊन असल्यामुळे कागदपत्रे मिळण्यास अडचणी आल्या असतील. परंतु, सर्व्हरची अडचण दूर करण्यास सांगितले आहे. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास कोणतीही अडचण नाही.

– ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे 

हेही वाचा

नागाळा पार्कात घरफोडी; दहा तोळे सोने लंपास

बोलताना मर्यादा सांभाळा; अन्यथा आम्हीही बंधनातून मुक्त होऊ : दीपक केसरकर

पुणे : खासगी सावकारने पावणेदोन लाखांच्या बदल्यात घेतले 6 लाख, एकर जमीन

Back to top button