पुणे

पुणे : कुरकुंभ एमआयडीसीतील चोरी प्रकरणी ५ जण ताब्यात

अमृता चौगुले

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा

कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीतील इटरनिस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीतील केमिकल चोरी प्रकरणी आतापर्यंत एकूण ५ संशयितांना दौंड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे यांनी माहिती दिली.

इटरनिस कंपनीच्या कॅटॅलिस्ट रूममधुन जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीकडून आलेले २० किलो रोडिअम ऑन ॲल्युमिना केमिकल चोरीला गेले. ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रूपये किंमतीचे हे केमिकल आहे. याबाबत ४४७ दिवसांनी फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्याविरूध्द दौंडला गुन्हा दाखल केला आहे.  हा प्रकार २४ डिसेंबर २०२० ते ६ जानेवारी २०२२ यादरम्यान घडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती.

नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा

चोरी आणि फिर्याद यादरम्यान बराच कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापक विभाग इतक्या दिवस झोपले होते का, त्यांना मार्च महिन्यात कशी जाग आली, असे गंभीर आरोप नागरीकांमधून केले जात आहेत. या गुन्ह्यातील संशयितांबाबत पोलीसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. संशयितांची नावे देता येणार नाहीत. ही नावे समोर आल्यास इतरांचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होईल असे पोलीसांनी सांगितले. हे जरी पोलिसांच्या दृष्टीने योग्य असले तरी याबाबत मात्र, भलतीच चर्चा सुरू आहे, याचाही विचार होणे अपेक्षित आहे.

या केमिकल चोरीच्या तपासाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. पोलीस तपासातून आणि अटक केलेल्या पाच जणांकडून अजून काय उघड होणार याची नागरीकांमध्ये उत्सुकता आहे. या केमिकल चोरी प्रकरणी दोघांना शुक्रवारी (दि.१८) ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार (दि.२२) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तिघांना अटक करून सोमवारी (दि.२१) न्यायालयात हजर केले होते. त्यांना गुरूवार (दि.२४) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या केमिकल चोरीप्रकरणी आत्तापर्यंत पाच जण पोलिसांच्या हाती लागले असून, अजून ही माळ किती मोठी आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT