शंकर कवडे
पुणे: फळांचा राजा असलेल्या आंब्यांचा हंगाम बहरात असतानाच त्याच्या पिकविण्याच्या प्रक्रियेत रसायनांचा वाढता वापर चिंतेचा विषय ठरत आहे. बाजारात आंबे लवकर पिकवण्यासाठी इथेलीन स्प्रे आणि इथेफॉनच्या पुड्यांचा अतिरेक केला जात असल्याने ग््रााहकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विक्रेत्यांचे फावले आहे.
मार्च ते मे हा आंब्यांचा मुख्य हंगाम असून, गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात विविध भागांतून आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. रत्नागिरी, कर्नाटकसह दक्षिण भारतातील हापूस, पायरी, केशर, तोतापुरी, लालबाग, बदाम अशा विविध जाती बाजारात दाखल होत आहेत. तेथून शहराच्या विविध भागांत आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येतो. मात्र, मागील काही दिवसांत वाढती मागणी आणि स्पर्धा लक्षात घेता आंबे लवकर पिकविण्याच्या नादात रसायनांचा अतिरेक होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. मात्र, या घातक रसायनावर बंदी आल्यानंतर इथेफॉनचा पर्याय म्हणून वापर सुरू झाला.
इथेफॉनच्या वापरासाठी शासनाने ठराविक नियमावली दिली असली, तरी त्याचे पालन होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. वीस ते पंचवीस किलोच्या आंब्यांच्या क्रेटस्साठी पाच ते सहा पुड्यांचा वापर अपेक्षित असताना प्रत्यक्षात बारा ते पंधरा पुड्या वापरल्या जात असल्याने धोक्याची पातळी वाढली आहे. याशिवाय, काही विक्रेते थेट आंब्यांवर इथेलीन स्प्रे करून कृत्रिमरीत्या पिकविण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करीत आहेत. यामुळे फळांची गुणवत्ता घटते, चव बिघडते आणि सडण्याचे प्रमाणही वाढते. परिणामी, ग््रााहकांना जादा पैसे मोजूनही निकृष्ट दर्जाचा आंबा मिळत असल्याने त्यांची फसवणूक होत आहे.
...अशी होते आंबा पिकविण्याची प्रक्रिया
इथेफॉन हे पावडर स्वरूपात उपलब्ध असते. त्याची पुडी पाण्यात भिजवून किंवा थेट आंब्याच्या पेटीत ठेवली जाते. यानंतर इथेलीन वायू तयार होऊन पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. पाण्यात भिजवल्यास ही प्रक्रिया अधिक वेगाने होते आणि साधारण सात ते आठ दिवसांपर्यंत त्याचा प्रभाव टिकतो. इथेलीन वायू आंबा पिकण्यासाठी उपयुक्त असला तरी त्याचा अतिरेक आरोग्यास अपायकारक ठरू शकतो.
फळांवरील थेट फवारणी नियमबाह्य; आरोग्यासही घातक
आंबा पिकविण्यासाठी इथेलीनचा वापर ठराविक मर्यादेत आणि नियमानुसार करणे आवश्यक आहे. इथेफॉन किंवा इथेलीनचा अतिरेक, तसेच थेट फळांवर स्प्रे करणे हे नियमबाह्य असून, ग््रााहकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासण्या सुरू आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनीही संशयास्पद किंवा कृत्रिमरीत्या पिकवलेले फळ आढळल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बाजारात मिळणाऱ्या आंब्यांची चव पूर्वीसारखी राहिलेली नाही. बाहेरून आकर्षक दिसणारे आंबे आतून कच्चे, बेचव किंवा खराब निघतात. रसायनांचा अतिरेक होत असल्याची शंका येते. आम्ही पैसे मोजून चांगल्या दर्जाचा आंबा घेतो, पण गुणवत्तेचा अभाव जाणवतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा आहे.रूपेश तिकोणे, शनिवार पेठ