पुणे

स्वस्त धान्य योजनेने महागला खुल्या बाजारातील तांदूळ

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वस्तात तांदूळ देण्याच्या सरकारी योजनांचा लाभ त्या राज्यातील जनतेला झाला खरा; पण त्याचा फटका खुल्या बाजारातील तांदळाच्या उपलब्धतेला बसला असून, तिथल्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातही यंदा उत्पादन गतवर्षापेक्षा वाढूनही हंगामाच्या सुरुवातीला दर चढेच राहिले आहेत. काही राज्यांत निवडणुकीत स्वस्तात तांदूळ देण्याच्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी तसेच काही शासकीय योजनांत स्वस्त दराने तांदूळ देण्यात येत असल्याने नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच खुल्या बाजारात सर्व प्रकारच्या तांदळाची 15 ते 20 टक्के दरवाढ झाली आहे.

या वर्षी बासमतीव्यतिरिक्त अन्य तांदळाची निर्यातबंदी केल्यानंतरसुद्धा भाववाढ होऊ लागली आहे. यंदा तांदळाचे अपेक्षित उत्पादन 1360 लाख टन होते. मात्र, लहरी हवामानामुळे ते तेराशे लाख टन झाले. तरीदेखील गतवर्षापैक्षा हे उत्पादन दोन टक्क्यांनी जास्त आहे. गेली दहा वर्षे तांदळाचे उत्पादन दरवर्षी वाढतच आहे. मात्र, वेगवेगळ्या भागांत हवामानातील बदलामुळे उत्पादन आणि दर्जावर परिणाम झाला आहे. काही राज्यांत यंदा तांदळाची लागवड कमी झाली, तर काही राज्यांत लागवडीनंतर पाऊस कमी पडला.

विशिष्ट प्रकारच्या तांदळाला गेल्या वर्षी जास्त भाव मिळाल्याने काही राज्यांतील उत्पादकांनी यंदा तांदूळ लागवडीत बदल केला.
काही ठिकाणी अवकाळी पावसाने भातपिकांचे नुकसान झाले. काही राज्यांमध्ये स्वस्त दराने तांदूळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. याचा एकत्रित परिणाम होऊन यंदा बासमतीबरोबरच अन्य तांदळाचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले, अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी दिली.

महाराष्ट्रातील इंद्रायणी तांदूळ आणि नागपूर, भंडारा येथील कोलम तांदळाची सर्वाधिक दरवाढ या नवीन हंगामात झाली. गेल्या डिसेंबरच्या तुलनेत यंदा त्यांचे प्रतिक्विंटलचे दर दीड हजार रुपयांनी वाढले. इंद्रायणी तांदळाचे दर 5500 ते 6000 रुपये, तर कोलमचा दरही 5500 ते 6500 रुपयांवर पोहचला. यंदा महाराष्ट्रात आवश्यकतेपेक्षा कमी पावसाने तांदळाचे उत्पादन घटले. काही ठिकाणी अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले.

मध्य प्रदेशातील सुरती कोलम तांदळाचे दर गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत दीड ते दोन हजारांनी वाढून 7000 ते 7500 रुपयांवर पोहचले. महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशातही पावसाचे प्रमाण कमी होते. उत्पादनामध्ये 60 ते 70 टक्के घट झाली. मात्र, या वर्षी मध्य प्रदेशातून येणार्‍या आंबेमोहोर तांदळाचे दर गेल्या वर्षाप्रमाणेच आहेत. गेल्या वर्षी आंबेमोहोरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, यंदा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर आंबेमोहोर तांदळाची लागवड केली. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढले. त्याचे प्रतिक्विंटलचे दर 5500 ते 6500 रुपयांपर्यंत आहेत.

गुजरात येथील सुरती कोलम किंवा गुजरात 17 जातीच्या तांदळाचे उत्पादन कमी, अवकाळी पावसाने उत्पादनाचे नुकसान या कारणांमुळे दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. यंदा प्रतिक्विंटलचा दर सहा ते सात हजार रुपये आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा येथून येणार्‍या बासमती तांदळाचे दर गेल्या वर्षी डिसेंबरच्या तुलनेत दीड हजार रुपयांनी वाढला. यंदाचे दर साडेअकरा ते तेरा हजार रुपयांदरम्यान आहेत. पारंपरिक बासमती तांदळाच्या दरवाढीमुळे 1121 बासमती, पुसा बासमती, बासमती तिबार, दुबार, मोगरा, बासमती तुकडा व कणी या सर्व तांदळांचे दरही 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटकातून येणार्‍या मसुरी, डॅश, परिमल व सोनामसुरी तांदळाचे दर वधारले आहेत. तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT