शिवनगर: पैशांचा वारेमाप वापर, सत्तेचा दुरुपयोग करून अधिकार्यांवर दबाव आणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्र्यांनी जिंकली, असा आरोप सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी केला आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सोमवारी (दि.7) सांगवी (ता. बारामती) येथे आयोजित आभार मेळाव्यात तावरे बोलत होते.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, बँकांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षण संस्थेचे शिक्षक, आरटीओ कार्यालयातील अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासदांवर प्रचंड दबाव आणला गेला, असा आरोप देखील चंद्रराव तावरे यांनी केला. (Latest Pune News)
आम्ही खिलाडू वृत्तीने पराभव मान्य केला आहे; तथापि या वयात देखील सर्वांना बरोबर घेत सत्ताधारी संचालक मंडळावर अंकुश ठेवून चुकीच्या पद्धतीला विरोध करणार आहे. संघर्ष करून ऊस उत्पादक शेतकर्यांना जास्तीचे पैसे मिळतील, यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही तावरे यांनी सांगितले
अनेक खासगी साखर कारखान्यांनी विस्तारीकरण केले आहे. त्यामुळे कारखाने तीन ते चार महिनेच गाळप करतील. अशावेळी माळेगाव कारखान्याला ऊस मिळणे कठीण जाईल. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने विस्तारीकरण करावे, असे मत चंद्रराव तावरे यांनी केले.
अजित पवार यांच्या अधिपत्याखालील कारखान्यांची उदाहरणे त्यांनी दिली. बारामती अॅग्रो, दौंड शुगर, अंबालिका, साखरवाडी शरयू, स्वराज आदी साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे गाळप हंगाम तीन ते चार महिनेच असेल.
त्यामुळे भविष्यात आपल्याला ऊस कमी पडणार आहे, याचा विचार करता माळेगाव कारखान्याने गाळप क्षमता वाढवावी, विस्तारीकरण करावे, परिणामी प्रतिदिन अधिकचा ऊस गाळप केल्यामुळे कमी दिवसात जास्तीचे गाळप करून अधिकचे उत्पादन घेता येईल. त्यामुळे सभासदांना जास्तीचे पैसे मिळण्यास मदत होईल, विस्तारीकरण केले नाही तर आम्ही तुमच्या दारात आलोच, असा इशारा सत्ताधार्यांना तावरे यांनी देऊन यासाठी सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.
अजित पवार यांनी महापाप केले : रंजन तावरे
या वेळी रंजन तावरे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यात घेऊन महापाप केले. माळेगाव कारखाना संपवला की खासगीकरणाच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना लुटता येईल, असा आरोप तावरे यांनी अजित पवार यांच्यावर केला. मतमोजणी जवळपास 36 तासांपर्यंत केली. यामध्ये कर्मचार्यांच्या शारीरिक तथा मानसिक क्षमतेचा विचार केला नाही. जर 18 तासांत मतमोजणी पूर्ण केली असती तर निकाल वेगळा लागला असता, असे मत तावरे यांनी व्यक्त केले.
चंद्रराव तावरे यांचा अजित पवारांना सवाल
कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पत्र देऊन कायद्याप्रमाणे अध्यक्षाची निवड व्हावी एवढीच मागणी करत होतो. यासाठी औरंगाबाद खंडपीठाचा दाखला देत होतो, परंतु अधिकार्यांवर दबाव आणून पत्र उशिरा दिल्याचे कारण सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मी कायद्याने वागलो तर मलाच संकुचित वृत्तीचे म्हणता, असा सवाल चंद्रराव तावरे यांनी केला.